जेटच्या 20,000 कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या वाचवा; नॅशनल एव्हिएटर्स गिल्डचे पंतप्रधानांना साकडे
   दिनांक :15-Apr-2019
मुंबई:
 
जेटच्या 20,000 कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या वाचवा, असे साकडे जेट एअरवेजच्या वैमानिकांची संघटना नॅशनल एव्हिएटर्स गिल्डने पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातले आहे. या व्यतिरिक्त विमान कंपनीला वाचवण्यासाठी तातडीने 1,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही स्टेट बँकेला केली आहे.
 
सध्या कंपनीकडे रोख उपलब्ध नसल्याने ऋणकोंचे पैसे थकले असल्याने जवळपास सर्वच विमाने जमिनीवर असून, केवळ 6 ते 7 विमाने क्रियान्वित आहेत.
 
 
 
कंपनीची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी तत्काळ 1,500 रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती स्टेट बँकेला केली आहे, तसेच या कंपनीतील 20,000 कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या वाचवा, असे पंतप्रधान मोदींना साकडे घातल्याची माहिती गिल्डचे उपाध्यक्ष आदिम वलियानी यांनी कंपनीच्या मुख्यालयात प्रसारमाध्यमांसोबत चर्चा करताना दिली.
 
यापूर्वी कंपनीचे वैमानिक, अभियंते, चालक दलाचे सदस्य मुख्यालयात त्यांच्यातील एैक्य दाखवण्यासाठी कंपनीत एकत्र आले होते. कंपनीच्या वैमानिकांसह अभियंते आणि वरिष्ठ कर्मचार्‍यांना डिसेंबर 2018 पासून वेतन मिळालेले नाही. इतर श्रेणीतील कर्मचार्‍यांनाही कंपनीने मार्चपासून वेतन दिलेले नाही.