तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती पवारसाहेब- उत्पल मनोहर पर्रिकर
   दिनांक :15-Apr-2019
माझ्या वडिलांबद्दल तुम्ही केलेलं वक्तव्य बघून मला व माझ्या कुटुंबीयांना धक्क बसला आहे असं सांगणारं पत्र पर्रिकरांचे पूत्र उत्पल पर्रिकर यांनी लिहिले आहे. राजकिय फायद्यासाठी निधन झालेल्या माझ्या वडिलांचं नाव खोटेपणा करत वापरणं अत्यंत दुर्दैवी व असंवेदनशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझे वडिल जिवंत असताना व दुर्धर आजाराशी लढा देत असताना काही राजकिय नेत्यांनी, त्यांचं नाव क्षुद्र राजकीय फायद्यासाठी वारलं असा दाखला त्यांनी राहूल गांधींचं नाव न घेता दिला आहे.
 
 
आज मनोहर पर्रिकर आपल्यात नाहीत, कदाचित म्हणूनच तुम्ही त्यांच्या नावानं खोटं बोलत आहात आणि राजकिय परीघातला हा नीचांक असल्याचं उत्पल यांनी म्हटलं आहे. एक ज्येष्ठ व आदरणीय राजकारणी असलेल्या तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती पवारसाहेब, असंही उत्पल यांनी लिहिलं आहे.
 
 
परंतु तुम्ही आता त्यांचं नाव घेतलंच आहे तर मला सांगणं भाग आहे की, माझे वडील अत्यंत प्रामाणिक होते आणि त्यांनी देशाची सेवाच शेवटपर्यंत केली. त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. राफेल करार करण्यातही त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. नंतर ज्यावेळी गोव्याच्या जनतेनं त्यांना साद घातली तेव्हा ते पुन्हा गोव्यात परत आले. परंतु अत्यंत घाणेरड्या अशा प्रचाराचा एक भाग तुम्ही होत आहात हे बघून दु:खं होत असल्याचं उत्पल पर्रिकर यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटलं आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांपासून तुम्ही लांब रहा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.