शशी थरुर यांना केरळमध्ये अपघात, डोक्याला पडले ६ टाके
   दिनांक :15-Apr-2019
कोची:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर यांना केरळमध्ये अपघात झाला आहे. तिरुवअनंतपुरम येथील एका मंदिरात पूजा करताना ही घटना घडली. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थरुर यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या अंगावर रक्ताचे थेंबही पडल्याचे दिसून येत आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले आहे.

 



थंपानूर येथील गंधारी अमन कोवित मंदिरात शशी थरुर यांची तुला करण्यात येत होती. त्यावेळी थरुर हे एका तराजुत बसले होते, तर दुसऱ्या तराजुत काही साहित्य ठेवण्यात येत होते. त्यावेळी दुसऱ्या तराजुतील साहित्य कमी-अधिक झाल्याने थरुर यांचा तोल गेला. त्यामुळे त्यांना अपघात होऊन त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला ६ टाके पडले आहेत. सुदैवाने, गंभीर दुखापत टळली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.