...तर निवडणूक काळात व्हॉट्सॲप ब्लॉक होईल
   दिनांक :15-Apr-2019
नवी दिल्ली :
 लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, आणखी सहा टप्प्यांचे मतदान होणार आहे. निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया मोठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणार्‍या मेसेजचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सॲप काही फोन क्रमांकांना ब्लॉक केले आहे. त्याशिवाय काही युजर्सचे चॅट फीचर बंद केले आहे.
 
 
चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सॲपने हे फोन क्रमांक ब्लॉक केले असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्स ॲप ने आपल्या फ्रीक्वेंटली आस्कड क्वश्चन्समध्ये काही नियम स्पष्ट नमूद केले आहेत. कोणत्याही युजर्सने बल्क मेसेज, ऑटोमेटेड मेसेजचा प्रयत्न करता कामा नये. जर, एखाद्याला व्हॉट्स ॲप युजर्सला मेसेज पाठवला आणि त्याने तुमच्या मेसेजला रिपोर्ट केल्यास तुमचे अकाउंट बंद होऊ शकते.
 
अनोळखी व्यक्तींचे व्हॉट्सॲप नंबर ग्रुपमध्ये अँड केल्यास तुमचा व्हॉट्स ॲप ब्लॉक करू शकतो. व्हॉट्स ॲप वापरणार्‍यांच्या क्रमांकांची यादीची विक्री काही मार्केिंटग संस्थांकडून करण्यात येते. अशा फोन क्रमांकांची यादी बनवून एखाद्याच्या परवानगीशिवाय नंबर वापरल्यास व्हॉट्स ॲप तुम्हाला ब्लॉक करू शकतो.
 
बरेच व्हॉट्स ॲप युजर्स ब्रॉडकास्ट मेसेज पाठवतात. तुमचा फोन क्रमांक ज्यांना मेसेज पाठवू इच्छिता त्या युजर्सकडे सेव्ह नसेल, तर त्यांना ब्रॉडकास्ट मेसेज मिळू शकणार नाहीत. त्यामुळे अनोळखी लोकांना वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज तुम्ही पाठवत असाल, तर तुमचा व्हॉट्स ॲप क्रमांक रिपोर्ट होऊ शकतो. अशावेळी व्हॉट्स ॲप तुमचा अकाउंट ब्लॉक करू शकतो.
 
तुम्ही व्हॉट्स ॲप वापरण्यासाठी नियम व अटी यांच्याशी सहमत असल्याचे मान्य करता. त्यानंतरच ॲप वापरता येते. बहुतांशी जण हे नियम, अटी काय आहेत हे समजून न घेता ॲप वापरतात. व्हॉट्स ॲपद्वारे वर्णभेदी, द्वेष निर्माण करणारे मेसेज, धमकी देणारे मेसेज पाठवण्यास मनाई आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येते.