अमरावतीत प्रचारतोफा थंडावल्या
   दिनांक :16-Apr-2019
 
 
दुचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन
उमेदवारांचा गाठी-भेटींवर जोर
 
 
अमरावती: अमरावती लोकसभा मतदारसंघात गुरुवार 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याच्या 24 तासापूर्वी म्हणजेच मंगळवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी मतदार संघातला जाहीर प्रचार थांबला. तत्पूर्वी सर्वच प्रमुख उमेदवारांनी विविध ठिकाणी सभा व रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघात 24 उमदेवार उभे आहेत. त्या उमेदवारांनी आपआपल्यापरिने गेल्या पंधरा दिवसात प्रचार केला. काही प्रमुख उमेदवारांनी जोरकस प्रचार करुन जनतेचे लक्ष आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या गेल्या पंधरा दिवसात अमरावती मतदार संघामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. भाजप व शिवसेना आणि राष्ट्रवादी, बसपा, वंचीत बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या सभा मतदारसंघात झाल्या. विविध ठिकाणी रॅली काढून उमेदवारांनी संपर्क अभियानही राबविले. तसेच उमेदवारांनी कॉर्नर सभा, बैठका, घरोघरी संपर्क, अशा विविध मार्गाने आपला प्रचार केला. मतदार संघात अनेक प्रमुख ठिकाणी मेळावे सुद्धा उमेदवारांनी घेतले. गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेला हा जाहीर प्रचार मंगळवार 16 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता थांबला.
 
 
 
 
 
तत्पूर्वी शिवसेना-भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहर व मतदारसंघात विविध ठिकाणी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विविध ठिकाणी रॅली काढल्या. वंचीत बहुजन आघाडी, बसपाच्या कार्यकर्त्यांनिही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विविध ठिकाणी रॅली व सभा घेतल्या. जाहीर प्रचार थांबल्यानंतर उमेदवार आता प्रत्यक्ष भेटीगाठीवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. तसे नियोजनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे 18 एप्रिल रोजी होणार्‍या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत 18 लाख 30 हजार मतदार मतदान करणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन मतदानाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.