बिहारमध्ये बंडखोरीने सारेच पक्ष हैराण
   दिनांक :16-Apr-2019
 
 
बिहारमध्ये भाजपा-जदयु युती तर कॉंग्रेस-राजद यांच्यात युती झाली आहे. पण, बंडखोरीने या सर्वच पक्षांना अक्षरश: हैराण करून सोडले आहे.
10 जागी आधीच बंडखोरी झाली असताना, आता यात नवी भर पडली आहे, ती कॉंग्रेसचे अ. भा. प्रवक्ते शकील अहमद यांची.
शकील अहमद यांना मधुबनीतून तिकिट न देता ही जागा विकासशील इंसान पार्टीला दिल्यामुळे ते नाराज झाले आहेत. अहमद यांचे म्हणणे आहे की, मधुबनीत विईपा भाजपा-जदयु युतीला टक्कर देऊ शकणार नाही. त्यामुळे मी अ. भा. प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून कॉंग्रेसने मला पािंठबा द्यावा व निवडणूक चिन्हही मिळावे, अशी मागणी केली आहे. या मधुबनीवरून प्रचंड घोळ निर्माण झाला आहे. या मतदारसंघात आधीच माजी केंद्रीय मंत्री मोहम्मद अली अशरफ कासमी यांना राजदचे तिकिट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची धमकी दिली आहे. त्यांचा अर्ज राहिल्यास येथे चौरंगी सामना बघायला मिळणार आहे. भाजपा-जदयु युतीने येथे भाजपाचे दिग्गज नेते हुकूमदेव नारायण यादव यांचे पुत्र अशोक यादव यांना तिकिट दिले आहे. येथे 6 मे रोजी मतदान आहे.
 
 
 
आता शकील अहमद यांचे म्हणणे आहे की, चतरा मतदारसंघात आमच्या उमेदवाराविरुद्ध राजदने स्वत:चाही उमेदवार उभा केला आहे. तेथे जर मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर मधुबनीत का नाही? असा त्यांचा प्रश्न आहे. दुसरी बाब म्हणजे, सुपौलमध्ये कॉंग्रेसच्या रंजीत रंजन यांना तिकिट दिले आहे. तर राजदने एका अपक्षाला समर्थन घोषित केले आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेसही मला मधुबनीमध्ये अपक्ष म्हणून आपले समर्थन देऊ शकते. तिकडे मधेपुरामध्ये बाहुबली राजेश उर्फ पप्पू यादव यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्याविरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. शरद यादव हे राजदच्या कंदील चिन्हावर या वेळी निवडणूक लढवीत आहेत. 2014 मध्ये पप्पू यादव हे राजदमध्ये होते. त्या वेळी त्यांनी शरद यादव यांचा 56 हजार मतांनी पराभव केला होता. नंतर त्यांनी राजदच्या नेत्यांवरच तोंडसुख घेतल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. पप्पू यादव यांचा मधेपुरात वट आहे. त्यांच्याजवळ कार्यकर्त्यांची वानवा नाही. स्थानिक राजद कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, रंजीत रंजन आणि पप्पू यादव यांनी राजदचे खूप नुकसान केले आहे. यावेळी दोघांनाही धडा शिकविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
तिकडे जेहानाबाद आणि बांका मतदारसंघामध्ये भाजपालाही बंडखोरीने ग्रासले आहे. येथे भाजपा-जदयु युतीने जदयुचे चंदेश्वर प्रसाद यांना मैदानात आणले आहे. तर राजदने आमदार सुरेंद्र यादव यांना तिकिट दिले आहे. पण, येथे तेजस्वीचा मोठा भाऊ तेज प्रताप याने चंद्रप्रकाश यांना समर्थन घोषित केले आहे. येथे भाजपातर्फे विद्यमान खासदार अरुण कुमार यांना तिकिट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घोषित केला आहे.
 
बांका मतदारसंघातही जदयुचे उमेदवार गिरिधारी यादव यांच्या विरोधात भाजपाच्या पुतुल कुमारी सिंह यांनी बंडखोरी केली आहे. येथे राजदतर्फे जयप्रकाश नारायण यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुतुल कुमारी सिंह यांच्याकडे राजपूत मते मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपाने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. येथे एक निवृत्त आयपीएस अधिकारी श्रीधर मंडल यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. या मतदारसंघात राजपूत आणि यादव मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांवर डोळा ठेवून सर्वजण आपापले नशीब आजमावीत आहेत. येथे 18 एप्रिलला मतदान आहे.
शिवहरमध्ये आणि महाराजगंज येथही बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. माजी खासदार लवली आनंद यांनी नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पण, त्यांना तिकिट न देता राजदला जागा सोडल्यामुळे त्यांनी राजद उमेदवाराच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. भाजपाने येथे विद्यमान खा. रमा देवी यांना तिकिट दिले आहे. शिवहर येथे 12 मे रोजी मतदान आहे. राजदने अजून आपला उमेदवार उभा केलेला नाही. कारण, ही जागा तेजप्रतापने मागितली आहे. त्यांना अग्नेश सिंह यांच्यासाठी तिकिट मागितले आहे. या मतदारसंघात मोठ्या संख्येने राजपूत-वैश्य-मुस्लिम मतदार आहेत. राजदला येथे रामकिशोर सिंह यांना तिकिट द्यायचे आहे. पण, तेजप्रतापच्या प्रतापामुळे या जागेचा तिढा कायम आहे.
महाराजगंज येथे भाजपाने विद्यमान खा. जनार्दन सिंह सिगरीवाल यांना पुन्हा तिकिट दिले आहे. राजदने येथे रणधीर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. पण, येथे माजी विधानपरिषद सदस्य महाचंद्र प्रसाद सिंह यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे येथे थेट लढत आता तिहेरी झाली आहे.
वाल्मीकिनगर येथे विद्यमान खासदार सतीशचंद्र दुबे यांनी बंडखोरी केली आहे. कारण, ही जागा युतीत जदयुकडे गेली आहे. जदयुने येथे बैद्यनाथ महातो यांना तिकिट दिले आहे. येथे कॉंग्रेसने शाश्वत केदार पांडे यांना तिकिट दिले आहे. तर बसपाने दीपक यादव यांना मैदानात उतरविले आहे. दीपक यादव हे एका साखर कारखान्याचे मालक आहेत. तर शाश्वत पांडे हे माजी मुख्यमंत्री केदार पांडे यांचे पुत्र आहेत. येथे एक स्थानिक जमात थारू यांची अडीच लाख मते आहेत.
पूर्व चंपारण मतदारसंघात राजदने आकाश िंसह यांना तिकिट दिले आहे. पण, यामुळे राजदचे कार्यकर्ते खवळले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पक्षाने विनोद श्रीवास्तव यांना तिकिट द्यायला हवे होते. येथे 12 मे रोजी मतदान आहे. आकाश सिंह यांचे जनमानसात काहीही काम नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असे पत्रच स्थानिक नेत्यांनी पक्षाचे मुखिया तेजस्वी यादव यांना पाठविले आहे.
एकूणच राजद-कॉंग्रेस महायुती आणि इकडे भाजपा-जदयु युती झाली असली तरी सर्वच पक्षांसाठी स्थिती आलबेल नाही. राजद युतीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे झाल्याने ते सुद्धा चिंतेत आहेत. अजून सहा टप्पे बाकी आहेत. काय होते याचे चित्र समोर येतच राहणार आहे.