बजरंग अली !
   दिनांक :16-Apr-2019
निवडणुकीत धर्म, जात, पंथ आदींचा वापर करू नये, असे आचारसंहितेत कितीही सांंगितले जात असले तरी, कोणताही पक्ष, नेता याला जुमानताना दिसत नाही. काही लोक थेट जातधर्माची नावे घेतात, तर काही अप्रत्यक्षपणे, आडूनआडून तीच गोष्ट करतात. एकमेकाला नावे ठेवत सारेच एकसारखे वागतात! आपल्या लोकशाहीचे दुर्दैव हेच आहे.
 
 
 
निवडणुकीनंतरच्या साडेचार वर्षांमध्ये फारसा गाजावाजा न होणारे जातधर्म निवडणुकीच्या तोंडावर एकदम उफाळून येतात. जातधर्मांचे मुखंड, तसेच राजकीय पक्षांचे नेते जातीय समीकरणे मांडू लागतात. कोणता पक्ष आपल्या जातवाल्याला तिकीट देऊ शकेल याची चाचपणी जातवाले घेतात, तर कोणता उमेदवार जातीच्या गणितात भारी पडेल याचा अंदाज पक्षवाले घेतात. सर्वच मतदारसंघांमध्ये असेच होते असे नाही. पण, बहुतांश क्षेत्रात अशीच फुटपट्टी लावली जाते. यात उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम असा भेद दिसत नाही. सर्वीकडे थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. त्यातही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान वगैरे काही राज्यांमध्ये याचे प्रस्थ जास्त आढळते. (आपला पुरोगामी महाराष्ट्रही आता त्याच वळणावर गेला आहे!)
 
उत्तर प्रदेशात जातधर्माचे उल्लेख फारच खुलेआम होताना दिसतात. भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ िंहदूंना साकडे घालतात. बसपानेत्या मायावती दलितांना, मुस्लिमांना आवाहन करतात. मुलायमिंसग गटाचे लोक यादव-मुस्लिमांना चुचकारतात, तर मुस्लिम नेते मुसलमानांना. यात कोण सुरुवात करतो याला काही अर्थच राहत नाही. सारे एकाच स्वरात बोलत असतात.
 
एका सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले- कुछ लोग बोल रहे है कि उनके अली है! तो मै बतादूंं कि हमारे बजरंगबली है! यावर मायावती म्हणाल्या- हमे अली और बजरंगबली दोनो चाहिए! खासकर बजरंगबली, क्यूंकि वो हमारे अनुसूचित जमातके है! सपानेते आझमखान त्याच्याही पुढे गेले. ते म्हणाले- बजरंगबली नही, बजरंग अली! हनुमान तो हमारेही है! जणू काही शर्यत लागली आहे बजरंगबलीला आपल्याकडे ओढण्याची!
 
आझमखान हे सपाच्या संस्थापकांपैकी एक आहेत आणि सलग नऊदा रामपूरचे आमदार आहेत. यावेळी पक्षाने त्यांना रामपूर लोकसभेचे तिकीट दिले. त्यांच्याविरोधात भाजपाने रिंगणात आणली अभिनेत्री जयाप्रदा. तेलुगू देसम ते भाजपा या प्रवासात जयाप्रदा दोनदा रामपूरची खासदार राहिली आहे. परंतु, अमरिंसग यांच्यासोबत सपातून बाहेर पडली आणि आता भाजपा उमेदवार म्हणून परत आली. तिच्याशी सामना होताच आझमखान उद्गारले- वो तो नाचनेवाली है! सपात असताना हीच जयाप्रदा त्यांना चालली. आता मात्र ती नाचणारी ठरत आहे. यालाच आपल्याकडे राजकारण म्हणायचे! रामपूर हा मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मतदारसंघ आहे. काय सुरू आहे आज तेथे!
 
विनोद देशमुख 
9850587622