उपांत्य फेरी गाठण्याचे बार्सिलोनाचे ध्येय
    दिनांक :16-Apr-2019
चॅम्पियन्स लीग फुटबॉल:
 
 लिओनेल मेसीच्या बार्सिलोना संघासमोर तब्बल चार वर्षांनंतर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचे उद्दिष्ट असेल. उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा १-० असा पाडाव केल्यामुळे आता घरच्या मैदानावर मंगळवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार) होणाऱ्या परतीच्या सामन्यात बार्सिलोनाला उपांत्य फेरी गाठण्याची चांगली संधी आहे.
 
 
 
२०१५ मध्ये विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या बार्सिलोनाला गेल्या तीन मोसमांत उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले होते. बार्सिलोनाची मदार मेसीवर असली तरी दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या मेसीला अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर चॅम्पियन्स लीगचे चार वेळा विजेतेपद पटकावून देणाऱ्या मेसीला आता पाचवे विजेतेपद खुणावत आहे. ‘‘गेल्या मोसमात आम्ही जबरदस्त कामगिरी केली होती, पण अखेरच्या क्षणी पदरी अपयश आले होते. या वर्षी आम्ही पुन्हा एकदा कॅम्प न्यू येथे चॅम्पियन्स करंडक परत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ असे मेसीने सांगितले.