भारताच्या १५ सदस्यीय संघाबरोबर दिसणार 'हे' चार गोलंदाज
    दिनांक :16-Apr-2019
मुंबई :
 इंग्लिड कंडिशनचा विचार केल्यास, तेथे जलदगती गोलंदाज महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. पण, भारतीय संघ जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या तीन स्पेशालिस्ट गोलंदाजांसह इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे भारताला चौथ्या जलदगती गोलंदाजाची उणीव भासू शकते. ती भरून काढण्यासाठी निवड समितीने भारताच्या १५ सदस्यीय संघाबरोबर चार युवा जलदगती गोलंदाजांना इंग्लंडमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे भविष्याचा विचार असल्याचे बोलले जात आहे.
 
नवदीप सैनी, अवेश खान, खलील अहमद आणि दीपक चहर या चार युवा गोलंदाजांना इंग्लंडमध्ये भारतीय संघासोबत येण्याची संधी मिळाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी सैनी आणि खलील यांच्या नावावरही चर्चा झाली. पण, त्यांना अंतिम संघात स्थान मिळालेले नाही. पण, त्यांना संघासोबत इंग्लंडचा जाऊन सराव सत्रात सहभाग घेता येणार आहे.
 
भारतीय संघात तीन जलदगती गोलंदाजांसह युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंनाही स्थान देण्यात आले आहे. रिषभ पंतला संघात न घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पण, दिनेश कार्तिकला अनुभवाच्या जोरावर संधी मिळाली.
 
 
या संघातील सात खेळाडू हे प्रथमच वर्ल्ड कप खेळणार आहेत. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी सांगितले की,'' या संघात सात उपयुक्त गोलंदाज आहेत. आम्ही सर्व आघाडीवर सर्वोत्तम पर्याय निवडले आहेत. आमचा हा संघ संतुलित आहे. खलील आणि सैनी यांच्याही नावाची चर्चा झाली. तशीच गरज वाटल्यास दोघांपैकी एक इंग्लंडला नक्की जाईल.''