सफर बॉलीवूडफेम स्थळांची
   दिनांक :16-Apr-2019
 
 
 
 

 
 
भारतात अनेक सुंदर, मनोहारी, निसर्गसंपन्न ठिकाणं आहेत. या ठिकाणांनी बॉलिवूडला आकर्षित केलं. विविध चित्रपटांमधून या स्थानांचं सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचलं. ही स्थानं पर्यटनस्थळं म्हणून विकसित झाली. पुढची ट्रिप ठरवताना या ठिकाणांचा नक्कीच विचार करता येईल. बॉलिवूडला भुलवणार्‍या ठिकाणांविषयी...
* केरळने पर्यटकांना नेहमीच आकर्षित केलं. हे राज्य म्हणजे सौंदर्याची खाण. ‘गॉड्‌स ओन कंट्री’ या शब्दात केरळचा गौरव करण्यात आला आहे. केरळमधल्या बॅकवॉटर्सबद्दल आपल्याला माहीत आहे. पण ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटामुळे मुन्नारची लोकप्रियता वाढली. इथले चहाचे मळे लोकांना आकर्षित करू लागले. त्यामुळे तुम्हीही मुन्नारला नक्की जा.
* हिमालय पर्वताचं सौंदर्य अवर्णनीय. हिमालयाने वेढलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये बॉलिवूडने प्रवेश केला आणि हे राज्य पर्यटकांनी गजबजून गेलं. शिमला, मनालीसह डलहौसीसारख्या ठिकाणी चित्रपटांचं चित्रिकरण होतं.
* लेह-लडाखला लोकप्रियता मिळवून दिली ती ‘थ्री इडियट्‌स’ने. इथल्या निळाशार पँगॉंग लेकने सर्वांना आकर्षित केलं. लडाखला बाईकने जाणार्‍यांची संख्याही खूप मोठी आहे. विशेषत: तरुण मंडळी या सफरीला निघतात. शाहरूख खानच्या ‘जब तक है जान’मध्येही लडाख पहायला मिळतं.
* ‘रंग दे बसंती’मध्ये लुधियानातल्या दोराहा किल्ल्याचं चित्रण आहे. पंजाबला येणारे पर्यटक लुधियानाच्या या किल्ल्यालाही भेट देतात.
* कोलकाता म्हटलं की इथली बंगाली मिठाई आठवते. अनेक चित्रपटांमध्ये कोलकाताचं चित्रण करण्यात आलं आहे. विकी डोनर, बर्फी, व्योमकेश बक्षीसारख्या चित्रपटांमधून कोलकाताचं मनोहारी दर्शन घडलं. म्हणूनच पर्यटकही या शहराकडे वळले.
* राजस्थानमधल्या नहारगड किल्ल्याचं दर्शन बर्‍याच चित्रपटांमधून घडलं. अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला आता पर्यटकांना खुणावतो आहे.