भारतीयांना दहशतवाद, बेरोजगारी, भ्रष्टाचाराची सर्वाधिक चिंता
   दिनांक :16-Apr-2019
- सर्वेक्षणातून झाले सिद्ध
भारतात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांमध्ये विविध मुद्यांवरुन परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे मुद्दे भारतीयांसाठी महत्वाचे असल्याचे एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आले आहे.
 
 
भारतीयांना दहशतवाद, बेरोजगारी, आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचाराची जास्त चिंता वाटते. जगाला कशाची चिंता भेडसावते त्यासंदर्भात करण्यात आलेल्या जागतिक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार देशातील ७३ टक्के जनतेला देशाचा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे वाटते. आयपीएसओएसने एकूण २८ देशांचे सर्वेक्षण केले. त्यातील २२ देशांना आपण चुकीच्या ट्रॅकवर असल्याचे सांगितले.
राजकीय-आर्थिक भ्रष्टाचार, गरिबी, सामाजिक असमानता, बेरोजगारी, गुन्हे, हिंसाचार आणि आरोग्य या मुद्यांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाचा मुद्दा अधिक प्रखरपणे समोर आला. भारतीयांसाठी दहशतवाद महत्वाचा मुद्दा आहे. चीनमधल्या नागरीकांनी आपल्या देशाबद्दल सकारात्मक मत नोंदवले.
दहा पैकी नऊ लोकांनी चीन योग्य दिशेने पुढे जात असल्याचे सांगितले. सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानी त्याखालोखाल भारत आणि मलेशिया आहे. ‘जगाला कसली चिंता वाटते’ हा दर महिन्याला होणारा ऑनलाइन सर्वे आहे. ६५ वर्ष वयोगटाच्या आतील लोकांशी बोलून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भारत, चीन, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरेबिया आणि अमेरिका या देशांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आला होता.