इन्फंट जिजस पब्लिक स्कूलची मान्यता रद्द
   दिनांक :16-Apr-2019
प्रधान सचिवांनी घेतली नोंद
कठोर कारवाई करण्याचे निर्देश
आदिवासी मुलींच्या अत्याचार प्रकरणी फटका
 
चंद्रपूर: राजुरा येथील इन्फंट जिजस पब्लिक स्कूल या शाळेची मान्यता शासनामार्फत रद्द करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या शाळेच्या वसतिगृृहात झालेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात शाळेवर कठोर कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत.
राजुरा येथील घटनाक्रमाबाबत वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तथापि, राजुरा येथील इन्फंट जिजस पब्लिक स्कूल या शाळेमध्ये घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती शासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे इंग्रजी माध्यमातून खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता विभागाच्या 28 ऑगस्ट 2009 रोजीच्या शासन निर्णयानुसार नामांकित निवासी शाळा योजना सन 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार नामांकित निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण देण्यात येते. आतापर्यंत या योजनेंतर्गत 174 शाळांमध्ये सुमारे 54 हजार विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. इन्फंट जिजस पब्लिक स्कूलमध्ये सन 2011-12 पासून आजअखेर 292 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
 

 
 
इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल या शाळेत आदिवासी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या शाळेची नामांकित शाळा योजनेअंतर्गत दिलेली मान्यता तात्काळ रद्द करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने 16 एप्रिल रोजी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत नामांकित शाळा योजने अंतर्गत प्रवेश दिलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास शाळेत बोलावण्यात येऊ नये. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना इतरत्र शाळेत समायोजन करण्याची कार्यवाही आदिवासी विकास विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.
 
या शाळेच्या प्राचार्यांच्या पत्रानुसार, शाळेतील निवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना राजुरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यापैकी एका विद्यार्थिनीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता असल्याचे अभिप्राय आल्याने या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात कोणताही वेळ न दवडता तात्काळ आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर मार्फतच प्रथम तक्रार नोंदवण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासाच्या दृष्टीने या विद्यार्थिनींचे मानसोपचार तज्ज्ञांद्वारे समुपदेशन सुरु आहे. या संदर्भात प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र यांनी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून कारवाईची माहिती घेतली. या प्रसंगी पोलिसांनी चार शालेय कर्मचार्‍यांना अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या शाळेचे नाव नामांकित शाळा योजनेतून तातडीने रद्द करण्यात आले असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सखोल चौकशी करून, या शाळेवर कठोर कारवाई करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाला विनंती करण्यात आली आहे.