पंजाबपुढे राजस्थानचे आव्हान
    दिनांक :16-Apr-2019
सलग दोन सामन्यांत गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबची मंगळवारी विजयपथावर परतलेल्या राजस्थान रॉयल्सशी गाठ पडणार आहे. त्यामुळे ख्रिस गेल आणि जोस बटलर या उभय संघांतील आक्रमक फलंदाजांपैकी कोणता फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 
रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबला मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटच्या षटकात हार पत्करावी लागली, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुसारख्या गुणतालिकेच्या तळाला असणाऱ्या संघानेदेखील धूळ चारल्यामुळे पंजाबचा संघ आठ सामन्यांतून चार विजयांसह गुणतक्त्यात पाचव्या स्थानी आहे. सलामीवीर लोकेश राहुल व ख्रिस गेल पंजाबसाठी धावांचा डोंगर रचत आहेत. मधल्या फळीत करुण नायर, मयांक अगरवाल व डेव्हिड मिलर यांना मात्र कामगिरीत सातत्य राखण्याची आवश्यकता आहे.
गोलंदाजीत मोहम्मद शमी प्रभावी मारा करत असला तरी अश्विन, अँड्रय़ू टाय, सॅम करन यांच्याकडून त्याला अपेक्षित साथ लाभत नाही. त्याशिवाय ८.४० कोटींमध्ये संघात सहभागी झालेला वरुण चक्रवर्ती आणि मुजीब-ऊर-रहमान असे सरस फिरकीपटू राखीव खेळाडूंतच बसून आहेत.
दुसरीकडे मुंबईला त्यांच्याच मैदानावर पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या राजस्थानची मदार प्रामुख्याने धडाकेबाज बटलरवर असेल. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ व राहुल त्रिपाठी यांनी जबाबदारीने फलंदाजी करणे आवश्यक आहे.
गोलंदाजीत फिरकीपटू श्रेयस गोपाळ राजस्थानसाठी सातत्याने सुरेख कामगिरी करत असून त्याला धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट आणि जोफ्रा आर्चर यांचे वेगवान त्रिकुटदेखील उत्तम साथ देत आहे.
संघ
* राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशेन थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग, मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.
* किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), सॅम करन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मोझेस हेंड्रिक्स, हार्डस व्हिलजोएन, दर्शन नळकांडे, करुण नायर, सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन,अँड्रय़ू टाय, लोकेश राहुल, अंकित राजपूत, मनदीप सिंग, सिमरन सिंग, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, डेव्हिड मिलर.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १