अखेर निजामाबादमध्येही झाले इव्हीएमनेच मतदान
   दिनांक :16-Apr-2019
तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात अखेर इव्हीएम यंत्राद्वारेच मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.
हा मतदारसंघ देशातील सर्वाधिक चर्चेत त्या वेळी आला होता, जेव्हा अंतिम दिवशी एकूण 185 उमेदवार मैदानातच होते. त्यामुळे येथे मतदान मतपेटीतून घ्यायचे की, ईव्हीएम यंत्रांद्वारे असा बिकट प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला होता. एके क्षणी तर मतपत्रिकांद्वारेच मतदान घेण्याचा प्राथमिक निर्णयही घेण्यात येऊन, त्यासाठी लागणार्‍या मतपेट्यांची व्यवस्थाही करण्यात येणार होती. पण, तेवढ्या मतपेट्याच वेळेच्या आत उपलब्ध न झाल्यामुळे अखेर इव्हीएम यंत्रानेच मतदान घेण्याचा निर्णय अखेर आयोगाने घेतला. त्यासाठी प्रत्येक मतदानकेंद्रावर 12 इव्हीएम यंत्रे लावण्यात आली होती. मतदारांसाठी ही मोठीच कसरत ठरल्याचे दिसले. 185 उमेदवारांपैकी 178 हे हळद उत्पादक आणि मासेमारी करणारे आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला हळदीचे दर कमी दिले जात आहेत आणि कोळी बांधवांच्या समस्यांकडे सरकारने काहीच लक्ष दिले नाही. हे सर्व जण मिरवणुकीने अर्ज दाखल करण्यासाठी वाजतगाजत आले होते, हे विशेष. अखेरच्या दिवसांपर्यंत सरकारने या समुदायांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला. पण, त्यात त्यांना यश आले नाही. या मतदारसंघातून 2014 साली निवडून आलेल्या कल्वकुंतला कविता या निवडणूक लढवीत आहेत. त्या मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. भाजपाने येथे अरिंवद धर्मपुरी यांना तिकिट दिले आहे. येथे 11 एप्रिलला मतदान पार पडले.