मुलीची लग्नपत्रिका वाटणाऱ्या वडिलांचा उष्माघाताने मृत्यू
   दिनांक :16-Apr-2019
 
 
चामोर्शी : मुलीच्या लग्नपत्रिका वाटप असताना वडिलांचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. बिजेन रूपचंद मंडल असे मृतकाचे नाव आहे.
बिजेन हा चामोर्शी तालुक्यातील रश्मीपूरवरून नारायणपूरकडे बैलबंडीच्या मार्गाने दुचाकीने जात होता. दरम्यान वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तो रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत आढळला. याची माहिती रश्मीपूरच्या पोलिस पाटील प्रभा राजू कोडापे यांनी आष्टी पोलिस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून आष्टी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
बिजेन हा मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी दुचाकीने वरोरावरून आला होता. त्यांच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळल्या नाही. त्यामुळे त्याचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पुढील तपास एएसआय गोंगले करीत आहेत.