ऋषभ पंतने बॅटच्या तळाशी कोरले 'या' फलंदाजाचे नाव
   दिनांक :16-Apr-2019
विश्वचषकासाठी काल भारतीय संघाची घोषणा झाली. १५ जणांच्या या संघामध्ये अनेक नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तरी या १५ जणांच्या यादीमधून एक महत्वाचे नाव वगळण्यात आल्याने त्या नावाची जास्तच चर्चा आहे. हे नाव म्हणजे ऋषभ पंत. मात्र याचबरोबर मागील काही दिवसांपासून पंतची बॅटही चांगलीच चर्चेत आहे.
 
 
 
शुक्रवारी कोलकात्ताविरुद्धच्या सामन्यात पंतने शिखर धवनबरोबर महत्वपूर्ण भागीदारी करत दिल्लीला विजय मिळून दिला. दरम्यान पंतला पुन्हा सूर गवसला असला तरी सामन्यापूर्वीच्या सरावादरम्यानचे त्याचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पंतऐवजी पंतच्या बॅटचीच या फोटोंच्या माध्यमातून चर्चा होत आहे. पंतच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कॅमेराकडे पाठ करुन उभा असलेला पंत खांद्यावर आपली बॅट ठेऊन उभा असलेला दिसतो आहे. मात्र या फोटोतील सर्वात विशेष बाब म्हणजे पंतच्या बॅटच्या तळाशी लिहीलेले दोन शब्द. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी लोकप्रिय असलेल्या पंतच्या बॅटच्या तळाशी चक्क भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव कोरलेले आहे.
 
 
पंतने खांद्यावर घेतलेल्या या बॅटवर कोणत्याही प्रायोजकांचा लोगो नसल्याने ही बॅट त्याला विराटनेच गिफ्ट केल्याचे समजते. विराटने दिलेली ही विराट भेटवस्तू कायम स्मरणात रहावी म्हणूनच त्याने या बॅटखाली विराटचे नाव कोरून घेतल्याचे बोलले जात आहे.