तापसी पन्नू व भूमी पेडणेकर बनल्या शूटर आजी
   दिनांक :16-Apr-2019
अभिनेत्री तापसी पन्नू व भूमी पेडणेकर यांचा आगामी चित्रपट 'सांड की आँख'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी देखील या चित्रपटातील काही फोटो समोर आले होते. नुकतेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये त्या दोघी वयस्कर महिलेच्या लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटाची कथा वयस्कर शार्पशूटर महिलेवर आधारीत आहे. 'सांड की आँख' चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 
'सांड की आँख' चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये तापसी पन्नू व भूमी पेडणेकर घागरा आणि कुर्तीमध्ये दिसत आहेत. या पोस्टरवर टॅगलाईन दिली आहे की, तन बुढा होता है, मन बुढा नहीं होता. दुसऱ्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, वयाच्या साठीत सातशे मेडल जिंकले.

 
 
तापसी पन्नूने 'सांड की आँख' चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले की, यंदाच्या दिवाळीत फटाके नाहीतर बंदुकीच्या गोळ्या चालणार. तर भूमी पेडणेकरने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत लिहिले की, ही भूमिका आतापर्यंतची सर्वात कठीण आणि प्रेरणादायी भूमिकेपैकी एक आहे.
'सांड की आँख' चित्रपटात भूमी व तापसी यांच्यासोबत प्रकाश झा आणि विनित सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निधी परमार व अनुराग कश्यप करत आहेत. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.