संजय राऊत यांचे बेताल वक्तव्य
   दिनांक :16-Apr-2019
लोकसभा निवडणुकामुळे राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा धडाडत आहेत. त्यातच, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना, अनेकदा नेत्यांचा तोल घसरतो. विवादास्पद विधाने आणि राजकारणासाठी भाषेची सीमारेषा ओलांडली जात आहे. आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिलं आहे. ‘भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता’, असे वादग्रस्त विधान राऊत यांनी केलं आहे.
 
 
 
मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा तोल गेला. कायदे आमच्यासाठी बनवण्यात आले नाही. आम्ही हवे तेव्हा बदलू. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. आचारसंहिता चालू आहे. मात्र जे मनात आहे ते बाहेर नाही आलं की श्वास कोंडल्यासारखा होतो, असे म्हणत भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता असे राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या विधानामुळे त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिल्याचं दिसून येत आहे. कारण, आचारसंहिता असतानाही आपणास कशाचीच तमा नसल्याचं त्यांनी भरसभेत म्हटले. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग ठरेल का, तसेच त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्यातरी विरोधकांकडून याबाबत कुठलीही मागणी करण्यात आली नाही. पण, विरोधकांकडून राऊत यांच्या या वक्तव्याचं नक्कीच राजकीय भांडवल केलं जाऊ शकतं.