प्रथमच शेअर बाजार राहणार 10 दिवस बंद
   दिनांक :16-Apr-2019
जपानमधील शेअर बाजार प्रथमच सलग 10 दिवस बंद राहणार असल्याने जपानमधील नागरिकांच्या पोटात गोळा आला आहे. त्याला कारण म्हणजे हे नागरिक मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करतात. शेअर बाजारात ट्रेडिंग/ व्यवहार करणाऱ्यांकरिता प्रत्येक दिवशी चालणारे कामकाज अतिशय महत्वाचे असते. दिवसभरात लाखो- करोडो रुपयांचे व्यवहार पार पडत असतात. या कामकाजावर जगभरात घडणाऱ्या विविध घटनांचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे इतर सुट्ट्यावगळता शनिवार- रविवारच्या अधिकृत सुट्ट्यानंतर देखील जागतिक किंवा स्थानिक घटनांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात काय परिस्थिती तयार होईल याची प्रत्येक गुंतवणूकदाराला चिंता असते. असे असताना सलग 10 दिवसांच्या सुट्टीनंतर बाजार सुरु झाल्यानंतर काय परिस्थिती असेल याचा विचार करून जापनीज गुंतवणूकदार धास्तावले आहेत.
 
 
जपानमध्ये येत्या 26 एप्रिलपासून ते 6 मे पर्यंत सलग 10 दिवस सुट्ट्या आल्या आहेत. खरंतर, प्रत्येकच वर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जपानमधे सुट्ट्या असतात. या कालावधीत ते 'गोल्डन वीक/ सोनेरी सप्ताह' साजरा करतात. या कालावधीत जपानमधे सार्वजनिक सुट्ट्या असतात. मात्र, यावेळी जपानमधील क्राऊन प्रिन्स म्हणजेच नियोजित राजा नारुहितो राजे पदावर आरूढ होणार आहे. त्यामुळे यंदा या सुट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच शेअर बाजार सलग 10 दिवस बंद राहणार आहे.
शेअर बाजारात होणाऱ्या उलाढालीनुसार जपानचा शेअर बाजार सर्वात मोठ्या शेअर बाजारांपैकी एक आहे. जागतिक पातळीवर जपानचा टोकियो शेअर बाजार सर्वात अगोदर सुरु होतो तर अमेरिकेचा न्यूयॉर्क शेअर बाजार सर्वात शेवटी बंद होतो. त्यामुळे जगभरात घडलेल्या घडामोडींचा दुसऱ्या दिवशी जापनीज शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो.
यावेळी 1 मे रोजी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह रेपो दर जाहीर करणार आहे. त्याशिवाय व्यापार युद्ध, ब्रेक्झिट, कच्च्या तेलाचे वाढते दर यांमुळे शेअर बाजार अस्थिर आहेत. अशा परिस्थितीत सलग 10 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे अकराव्या दिवशी बाजार सुरु झाल्यानंतर काय परिस्थिती असेल याचा विचार करू जापनीज गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आपली 'पोझिशन' कट करून 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेण्याला पसंती देत आहेत.