कर्करोगापेक्षा उपचार जास्त वेदनादायी - सोनाली बेंद्रे
   दिनांक :16-Apr-2019
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेऊन काही महिन्यांपूर्वीच भारतात परतली आहे. मायदेशी परतल्यानंतर सोनाली विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. काही दिवसांपूर्वी अशाच एका कार्यक्रमांमध्ये सोनालीने हजेरी लावली होती. यावेळी तिने कॅन्सर आणि त्यावरील उपचार यांवर संवाद साधला. विशेष म्हणजे कॅन्सरपेक्षा त्याच्यावरील उपचार सर्वात जास्त वेदनादायी असतात, असं म्हणत तिने चाहत्यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहनही केलं.

 
 
नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सोनाली सहभागी झाली होती. यावेळी तिच्या कर्करोगाबाबत, तिने दिलेल्या लढ्याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. “कर्करोगासारखा आजार वेळीच लक्षात आला तर त्यावर उपचार घेणं परवडणारं ठरतं. हा आजार लवकर समजला तर उपचार घेताना होणाऱ्या वेदनाही कमी होतात. मात्र जर आजार लवकर लक्षात आला नाही तर प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे स्वत:ची नीट काळजी घ्या, हा आजार मला कधीच होणार नाही या भ्रमात राहू नका. तो कधीही आणि कोणत्याही वयात अचानकपणे होऊ शकतो”, असं सोनाली म्हणाली.
पुढे सोनाली सांगते, “कॅन्सर हा रोगच मुळात भयावह आहे. मात्र त्या आजारापेक्षा त्याच्यावर करण्यात येणारे उपचार हे सर्वात जास्त वेदनादायी असतात.” सोनालीला जुलै २०१८ मध्ये हाय ग्रेड कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्या या आजारपणाबाबत तिने स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली होती. तेव्हापासून न्युयॉर्कमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. काही महिन्यांपूर्वीच सोनाली या आजारावर उपचार घेऊन भारतात परतली आहे. त्यामुळे सोनाली आता परत रुपेरी पडद्यावर कधी झळकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.