अभिनेता विकी कौशल साकारणार 'अश्वत्थामा'
    दिनांक :16-Apr-2019
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' च्या यशानंतर आता अभिनेता विकी कौशल कोणत्या भूमिकेत दिसणार याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. विकी कौशल आता चक्क महाभारतातील एक पात्र पडद्यावर साकारणार आहे. महाभारतातील दुर्लक्षित पण तितकीच गूढ व्यक्तिरेखा म्हणजे 'अश्वत्थामा' . विकी त्याच्या आगामी चित्रपटात 'अश्वत्थामा'च्या भूमिकेत दिसणार आहे.
 
 
जन्मजात मस्तकावर नीलमणी घेऊन जन्माला आलेला 'अश्वत्थामा' कौरवपांडवांचा मित्र म्हणून वावरला. महाभारताच्या महायुद्धात तो कौरवांच्या बाजूनं लढला. महाभारतात उद्धृत केल्याप्रमाणे अश्वत्थामा अमर आहे. त्याचे हे चिरंजीवीत्व कलयुग संपल्यावरच संपुष्टात येणार आहे. अश्वत्थामाच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात विकी मुख्य भूमिका साकारणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्तानं 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'ची टीम पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'उरी'चे दिग्दर्शक आदित्य धर करणार असून निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहेत. आदित्य धर 'उरी' प्रदर्शित होण्यापूर्वीच 'अश्वत्थामा'च्या स्क्रिप्टवर काम करत होते. येत्या काही महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.