पोहण्याचा मोह होतो तेव्हा...
   दिनांक :16-Apr-2019
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यासाठी खासदार संभाजीराजे दोन दिवसाच्या चांदगड तालुक्यात दौर्‍यावर होते. प्रचारादरम्यान धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली आणि संभाजी राजेंना नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही.
 
 
 
खासदार संभाजी राजेंनी गाडी थांबवत कसलाही विचार न करता पाण्यात सूर मारला. सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही राजेंनी पाण्यात सूर मारला. खुद्द राजांना आपल्यामध्ये पाहून नदीत पोहत असलेल्या तरुणांनासुद्धा भरपूर आनंद झाला. राजेंसोबत मौजमजा करीत पोहण्याचा आनंद मुलांनी लुटला. नदीच्या थंडगार वाहत्या पाण्यात पोहून त्यांना विरंगुळा मिळाला. खासदार संभाजी राजे आज आपले राजेपण विसरून जनतेत एकरुप होऊन गेले. मुलांनी हीच संधी साधून संभाजीराजेंसोबत फोटो काढून घेतले.
 
हिरव्यागार निसर्गाचे देणं लाभलेला तालुका म्हणजे चांदगड. कोल्हापूरचे दक्षिण टोक एकीकडे, दुसरीकडे बेळगाव. इथल्या निसर्गात काजू, फणस, आंबे विपुल प्रमाणात आढळतात. चांदगडी भाषा मराठीच्या गोडव्यात भर घालणारी. अजूनही अस्सल ग्रामीण बाज पूर्ववत असलेला असा हा तालुका.