दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर टाकलेला बॉम्ब ७० वर्षांनी फुटला!
   दिनांक :16-Apr-2019
जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरात रविवारी माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब आढळला. रिपोर्टनुसार, हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन विमानाने पाडला होता. इतक्या वर्षांनंतरही हा बॉम्ब जिवंत होता. त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाने नियंत्रित विस्फोटाच्या माध्यमातून हा बॉम्ब फोडून निष्क्रिय केला. हा धमाका इतका जोरदार होता की, नदीतील पाणी ३० मीटर उंच उडालं होतं.
 
 
 
हा जोरदार धमाका करण्याआधी आजूबाजूच्या ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. असे सांगितले जात आहे की, या संपूर्ण अभियानदरम्यान फायर ब्रिगेड, पोलिस आणि रेड क्रॉसचे ३५० अधिकारी मदतीसाठी उपस्थित होते.
 
असा लागला बॉम्बचा शोध
अहवालानुसार, ९ एप्रिलला फायर ब्रिगेडची टीम नदीमध्ये डायव्हिंगचा सराव करत होती. यादरम्यान त्यांना हा बॉम्ब आढळला. त्यांनी सुरुवातीला हा बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला. पण हा २५० किलो वजनाचा बॉम्ब डिफ्यूज करताना फुटू शकतो अशी भीती करण्यात आली होती.
बॉम्ब शोधक पथक हा बॉम्ब नदीत साधारण ५ ते ६ मीटर खोल घेऊन गेले. त्यानंतर या बॉम्बचा धमाका करण्यात आला. नदीतील जीवांना काही धोका होऊ नये म्हणूण नदीत आधी छोटे स्फोट करण्यात आले. जेणेकरुन नदीतील जीव दूर निघून जातील.