फलंदाजांनी चुकांमधून बोध घ्यायला हवा : अजिंक्य राहणे
   दिनांक :17-Apr-2019
IPL 2019
 
पंजाबने मोहालीच्या मैदानावर पाहुण्या राजस्थानला १२ धावांनी धूळ चारली. राहुलचे अर्धशतक (५२) आणि मिलरची फटकेबाज खेळी (४०) यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात ११ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.
 
 
राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामना संपल्यानंतर आपल्या संघातील सहकाऱ्यांना खेळात सुधारणा करण्यासाठी कानपिचक्या दिल्या. तो म्हणाला की १८२ धावांचे आव्हान हे पेलण्यासारखे होते. डावाची सुरुवातदेखील चांगली झाली होती. पण अशा प्रकारच्या आव्हानाचा पाठलाग करताना झटपट गडी बाद होणे योग्य नाही. गोलंदाजानी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजांनी मात्र चुकांमधून बोध घ्यायला हवा.
आमच्या संघाला १८२ धावांचा पाठलाग करायचा होता. अशा वेळी आपण कोणालाही फारसा दोष देऊ शकत नाही. स्टुअर्ट बिन्नी याने उत्कृष्ट फटकेबाजी करत आशा पल्लवित केल्या होत्या. केवळ १ -२ मोठ्या फटक्यांची गरज होती. तसेच आमच्या गोलंदाजीत शेवटचे षटक महाग पडले. त्याचा परिणाम सामन्यावर झाला. त्रिपाठी मधल्या फळीत चांगली कामगिरी करू शकत नव्हता, त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्यात आले आणि मी चौथ्या क्रमांकावर खेळलो. पण आम्ही एकत्रित गडी गमावल्यामुळे सामना जिंकू शकलो नाही, असेही रहाणे म्हणाला.