अर्सेनलची चौथ्या स्थानी झेप!
   दिनांक :17-Apr-2019
इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल
पिएरे-इमेरिक औबामेयांग याने सुरुवातीलाच केलेल्या एकमेव गोलाच्या बळावर अर्सेनलने १० जणांसह खेळणाऱ्या व्ॉटफोर्डचा १-० असा पराभव करून इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या अव्वल चार जणांमध्ये मजल मारली.
 
 
व्ॉटफोर्डचा गोलरक्षक बेन फोस्टर याने केलेल्या चुकीचा फायदा उठवत ओबामेयांग याने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली होती. त्यानंतर व्ॉटफोर्डचा कर्णधार ट्रॉय डीने याला ११व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवल्यामुळे त्यांना १० जणांसह खेळावे लागले. मात्र त्यानंतर मोठय़ा फरकाने विजय मिळवण्यात अर्सेनलला अपयश आले.
‘‘आम्हाला अपेक्षेनुसार सामन्यावर वर्चस्व गाजवता आले नाही. गोल करण्याच्या काही संधी वाया घालवल्यामुळे संघ तणावात होता. दुसरा गोल कोण झळकावणार, हे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. पण आम्हाला एकाच गोलावर समाधान मानावे लागले,’’ असे अर्सेनलचे प्रशिक्षक उनाय एमेरी यांनी सांगितले.
लिव्हरपूलने गुणतालिकेत ८५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून मँचेस्टर सिटी ८३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. टॉटेनहॅम ६७ गुणांनिशी तिसऱ्या तर अर्सेनल ६६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.