चेन्नई आज प्ले ऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी खेळणार
   दिनांक :17-Apr-2019
 सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी होणाऱ्या सामन्यात चेन्नईने प्ले-ऑफ फेरी गाठण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. चेन्नईला बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी अवघ्या एका विजयाची आवश्यकता असून ते सनरायजर्सविरुद्ध हे लक्ष्य गाठतील का, याची उत्सुकता क्रिकेटशौकिनांना आहे. 
चेन्नईने आठ सामन्यांमधून सात विजय मिळवत १४ गुणांनिशी अग्रस्थान काबीज केले आहे. त्याउलट हैदराबादला सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादची फलंदाजी पुरती कोलमडली होती. 
 
 
वॉर्नरच्या ४०० धावा आणि बेअरस्टोच्या ३०४ धावा सोडल्यास, विजय शंकर हा त्यांचा (१३२ धावा) तिसऱ्या क्रमांकाचा अव्वल फलंदाज ठरत आहे. मनीष पांडे (सहा सामन्यांत ५४ धावा), दीपक हूडा (सहा सामन्यांत ४७ धावा), युसूफ पठाण (३२ धावा) या मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हैदराबादला भोवत आहे. युसूफला गेल्या वर्षभरापासून एकदाही सामना जिंकून देणारी खेळी करता आलेली नाही.
दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने विविध वातावरणात, विविध प्रकारच्या खेळपट्टय़ांवर आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. हरभजन सिंग चेपॉकच्या खेळपट्टय़ांवर चमक दाखवत आहे, तर मिचेल सान्तनेर अन्य सामन्यांत छाप पाडत आहे. धोनीच्या अचूक रणनीतीचे हे फळ आहे. त्याचबरोबर लेग स्पिनर इम्रान ताहिरने या मोसमात १३ बळी मिळवले आहेत. धोनीच्या रणनीतीचा ताहिर हा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १
संघ
सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेअरस्टो, रिद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सान्तनेर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, स्कॉट कुगेलिन, एन. जगदीशन (यष्टिरक्षक).