हार्दिकने स्वतःला सिद्ध करून दाखवले : रोहित शर्मा
    दिनांक :17-Apr-2019
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या टप्प्यात ३७ धावांच्या तुफानी खेळीने मुंबईला विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पंडय़ाची मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने प्रशंसा केली आहे. हार्दिकला गोलंदाजीसह फलंदाजीतही स्वत:ला सिद्ध करायचे होते, ते त्याने करून दाखवले, असे रोहितने सांगितले.
‘‘हार्दिकच्या तडाखेबंद फलंदाजीचा त्याला आणि संघाला फायदा होत आहे. हीच गोष्ट त्याला आयपीएलमध्ये करून दाखवायची होती. आयपीएल हीच स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असल्यामुळे त्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही छाप पाडली आहे,’’ असेही रोहितने सांगितले.
 
 
जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने चार बळी मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला १७१ धावांमध्ये रोखण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ‘‘मलिंगा हा मुंबई इंडियन्स संघासाठी प्रदीर्घ काळापासून गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ राहिलेला आहे.
त्याच्या कामगिरीवर अनेकदा सामन्याचा निकाल ठरत असतो. गेल्या काही सामन्यांमध्ये तो नसल्याचा फटका आम्हाला बसला होता. तो लयीत असणे हे मुंबईसाठी अत्यावश्यक असते. मलिंगा हा अखेरच्या षटकांमध्ये अफलातून गोलंदाजी करीत संघासाठी अनेक वर्षे मोलाची भूमिका निभावत आहे.’’