सौदी अरेबियात दोन भारतीयांचा शिरच्छेद
   दिनांक :17-Apr-2019
हत्येचा आरोप असलेल्या दोन भारतीयांचा सौदी अरेबियामध्ये शिरच्छेद करण्यात आला. होशिआरपूरमधील सतविंदर कुमार आणि लुधियानामधील हरजीत सिंग यांचा सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार शिरच्छेद करण्यात आला. या दोघांवर एका भारतीयाची हत्या केल्याचा आरोप होता. २८ फेब्रुवारीला या दोघांच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.
 
 
शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी सौदी अरेबियातील यंत्रणेने रियाधमधील भारतीय दूतावासाला माहिती दिली नव्हती. सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार नातेवाईकांना त्यांचे मृतदेह मिळणार नाहीत. लुटीच्या पैशावरुन झालेल्या वादातून सतविंदर आणि हरजीत दोघांनी इमामुद्दीनची हत्या केली होती.
हत्या केल्यानंतर काही दिवसांनी दोघांना दारु पिऊन गोंधळ घातल्या प्रकरणी अटक झाली होती. त्यांना भारतात पाठवण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. पण त्याचवेळी त्यांचा हत्येशी संबंध असल्याचे समोर आले. सतविंदरची पत्नी सीमा रानीने पतीचे काय झाले त्याची माहिती जाणून घेण्यासाठी याचिका दाखल केली होती.
त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने पत्राद्वारे सीमा रानीला सतविंदर आणि हरजीतवर चाललेल्या खटल्याची माहिती दिली व २८ फेब्रुवारील २०१९ रोजी दोघांच्या शिरच्छेदाच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्याची माहिती दिली. शिक्षेची अंमलबजावणी करताना भारतीय दूतावासाला माहिती दिली नव्हती असेही त्या पत्रात म्हटले आहे.