पंत आणि रायुडू यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता
   दिनांक :17-Apr-2019
मुंबई, आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ :
 
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप २०१९ स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. पण या संघात रिषभ पंत आणि अंबाती रायुडू नसल्याने बऱ्याच जणांनी निवड समितीवर टीका केली. पण आता पंत आणि रायुडू यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

 
भारताच्या १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत. भारतीय संघाने १९८३ आणि २०११ मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. २००७ मध्ये भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही नावावर केला आहे. विशेष म्हणजे २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सात खेळाडू २०१९च्या स्पर्धेतही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला.
भारताच्या पंधरा सदस्यीत संभाव्य संघात पंत आणि रायुडू यांचे नाव नाही, पण तरीही त्यांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते. कारण निवड समितीने काही राखीव खेळाडू विश्वचषकासाठी ठेवले आहेत. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर हे राखीव खेळाडू भारतीय संघातून खेळू शकतील. या राखीव खेळाडूंमध्ये पंत आणि रायुडू यांचा समावेश करण्यात आला आहे.