डोपिंगमधून निर्दोष सुटलेला कांग भारतीय संघात
   दिनांक :18-Apr-2019
नवी दिल्ली,
भारताचा भालाफेकपटू देविंदर सिंह कांग याची 21 एप्रिलपासून दोहा येथे सुरू होणार्‍या आशियाई अजिंक्यपद ॲथ्लेटिक्स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. कांग याची नुकतीच जागतिक संघटनेतर्फे डोपिंग प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 
लघवीच्या नमुन्यातील चाचणीमध्ये ॲनाबोलिक स्टेरॉईड आढळून आल्यामुळे 30 वर्षीय कांगला 2017 साली अस्थायी रुपात निलंबित करण्यात आले होते. मात्र, अलिकडेच त्याला एआयु आणि वाडाद्वारा निर्दोष ठरविण्यात आले व या आरोपातून त्याची सुटका करण्यात आली.
 
 
कांग याची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी 82.16 मीटरची आहे. मात्र, गेल्या सत्रात डोपिंगच्या आरोपामुळे त्याला दोन स्पर्धांना मुकावे लागले होते. एवढेच नव्हे तर त्याला भारतीय ॲथ्लेटिक्स महासंघाच्या 80.75 मीटरच्या मानकापर्यंतही गोळा फेकता आला नव्हता. मात्र, शेवटच्या क्षणी त्याचा संघात समावेश करण्यात आला.
हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्टार भालाफेकपटू व राष्ट्रीय विक‘मवीर नीरज चोप्राला या संघात स्थान देण्यात आले नाही. त्याने आशियाड आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याची उणीव आता कांगला भरून काढावी लागणार आहे. भारतीय ॲथ्लेटिक्स महासंघाने 21 ते 24 एप्रिलदरम्यान होणार्‍या अजिंक्यपद स्पर्धेसाठी आधी 51 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. 23 खेळाडूंची निवड 13 एप्रिलला पतियाळा येथील निवड चाचणीनंतर करावयाची होती. अखेर बुधवारी करण्यात आलेल्या अंतिम छाननीनंतर 43 सदस्यीय संघ कायम ठेवण्यात आला आहे.
 
आशिया स्पर्धेतील 800 मीटर दौडीचा सुवर्णपदक विजेता मनजित सुंग दुखापत झाल्यामुळे निवड चाचणीत सहभागी होऊ शकला नाही, त्याच्या जागी केरळच्या मोहम्मद अफजलला संधी देण्यात आली आहे. महिलांच्या चार बाय 400 मीटर रिलेत प्राचीचा जिस्ना मॅथ्यूच्या जागी समावेश करण्यात आला आहे. पुरुषांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीसाठी राष्ट्रीय विक्रमवीर धारून अयासैमी जखमी झाल्यामुळे उपलब्ध होणार नाही. अनुभवी स्टीपलचेजपटू सुधा सिंह हिची एएफआयने निवड केली होती. मात्र,  क्रीडा मंत्रालयाने तिच्या नावावर शिक्कामोर्तब करायला नकार दिला. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुधाचे दोहासाठी विमानाचे तिकीटही काढण्यात आले आहे, त्यामुळे महासंघ तिच्यासाठी  क्रीडा मंत्रालयाकडे पुन्हा प्रयत्न करणार आहे.
महिलांच्या दहा हजार मीटरची दौडपटू संजीवनी जाधव हिलाही राष्ट्रीय संघात स्थान पटकाविता आले नाही.