विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा
   दिनांक :18-Apr-2019
जोहान्सबर्ग, 
वेगवान गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळखला जाणारा डेल स्टेन आणि हाशिम आमलासारख्या अव्वल फलंदाज या दिग्गज क्रिकेटपटूंचा दक्षिण आफ्रिका विश्वचषक क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. 30 मे पासून सुरू होणार्‍या या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 
 
 
आमलाचा जरी संघात समावेश करण्यात आला असला तरी तो गेल्या काही दिवसांपासून सूर गवसण्यासाठी धडपड करीत आहे. आमलाचा संघात समावेश झाल्यामुळे युवा फलंदाज रीजा हँड्रिक्सला बाहेर बसावे लागणार आहे. 29 वर्षीय हँड्रिक्सने आपल्या पदार्पणात शतक साजरे केले होते. त्याला 18 वनडे सामन्यात अवघ्या 26 च्या सरासरीने धावा गोळा करता आल्या आहेत. आमलासोबतच या संघात कर्णधार फाफ डुप्लेसिस, एडन मारक्रम आणि क्विंटन डीकॉकसारख्या खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. ड्युमिनी यंदाच्या विश्वचषक कि‘केट स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे. फिरकीपटू इम्रान ताहिरचीही ही शेवटची स्पर्धा आहे. ताहिरसोबत फिरकी गोलंदाज म्हणून तबरेज शमसी याला संघात स्थान देण्यात आले आहे.
 
दक्षिण आफ्रिकेचा स्पर्धेतील पहिला साखळी सामना यजमान इंग्लंड संघाविरुद्ध 30 मे रोजी लंडन येथे खेळला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघ : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डीकॉक (यष्टिरक्षक), ज्यो पॉल ड्युमिनी, ॲडेन मारक्रम, डेव्हिड मिलर, लुंगी नगिदी, एनरिच नॉर्टजे, अँडिले फेहलुकवाओ, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शमसी, डेल स्टेन, इम्रान ताहिर, रॅली वेन डर डुसेन.