सदिच्छादूत खेळाडूनेच केले आचारसंहितेचे उल्लंघन
   दिनांक :18-Apr-2019
- निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

 
भुवनेश्वर,
मतदार व नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोनाने समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींप्रमाणेच नावाजलेल्या खेळाडूंचीही सदिच्छादूत म्हणून निवड केली होती. यात भारताची अव्वल महिला वेगवान धावक दूतिचंद हिचाही समावेश होता. मात्र, तिचे फेसबुकवर एका उमेदवारांचा प्रचार केल्यामुळे ही सदिच्छादूत खेळाडू आचारसंहितेचा भंग केल्यामुळे अडचणीत आली आहे.
 
दूतिचंदने फक्त लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी होती. मात्र, तिने ओडिशातील सत्तारुढ बीजू जनता दलाचे कंधमाल लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अच्युत शर्मा यांच्याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहिल्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहे. कंधमाल या लोकसभा मतदार संघात आज गुरुवार 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. 
 
मी कोणत्याही उमेदवाराचे किंवा राजकीय पक्षाचे समर्थन करीत नाही. मी कोण्या अच्युत शर्मा याला मतदान करा, असे आवाहन करीत नाही. मात्र, मी व्यक्तिश: निवडणुकीतील त्यांच्या यशासाठी प्रार्थना करते. कारण, ते माझ्यासाठी परमेश्वर आहेत आणि त्यांनी माझ्या क्रीडा कारकिर्दीला वाढविण्यासाठी सहकार्य केले आहे व प्रोत्साहित केले आहे, असे दूतीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच या माझ्या पोस्टचे राजकारण केले जाऊ नये, असे आवाहनही तिने केले आहे.
निवडणूक आयोगाने मतदारांना मताधिकाराची जाणीव करून देण्यासाठी म्हणून ओडिशात ज्या सहा जणांची सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे त्यात दूतिचंदचाही समावेश आहे.
 
 
ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होत आहेत. दूतिचंदच्या पोस्टनंतर आता तिच्यावर आरोप लावला जात आहे की, या जगवि‘यात ॲथ्लिटने आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. यासंदर्भात ओडिशाच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे एक रीतसर तक्रारही करण्यात आली आहे. या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुरेंद्र कुमार म्हणाले की, या प्रकरणाचा तपास केला जात असून सोशल मीडियावरील खात्याची सत्यता पडताळून पाहिली जात आहे.
निवडणूक आयोगाने दूतिचंदसह पॅरा ॲथ्लिट जयंती बेहरा, पॅरा शटलर प्रमोद भगत, गायक ऋतुराज मोहंती आणि चित्रपट अभिनेत्री शिवानी संगीता व स्वराज या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अेाडिशाचे सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली होती.