अमरावती मतदारसंघात मतदानाचा आढावा
   दिनांक :18-Apr-2019
 
 
अमरावती: अमरावती लोकसभा मतदारसंघात गुरुवार, 18 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजतापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसला. पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी 9 पर्यंत सरासरी 6.86, 11 वाजे पर्यंत 17.72 आणि 1 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
निवडणुकीत एकूण 24 उमेदवार रिंगणात आहे.
 

 
 
 
संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी अधिकारी- कर्मचारी दक्षतापूर्वक जबाबदारी सांभाळत आहे. शहरी भागात सकाळी मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. बहुतांश मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. महिला व तरुणांमध्ये विशेष उत्साह होता. जेष्ठ नागरिकांनी सुद्धा सकाळीच मतदानाला प्राधान्य दिले. मतदारसंघात 18 लाख 30 हजार 561 एकूण मतदार आहेत. यापैकी 9 लाख 43 हजार 444 पुरुष, 8 लाख 87 हजार 80 स्त्रिया व तृतीयपंथी 37 मतदार आहेत. 5 हजार 189 दिव्यांग, दोन हजार 530 सैन्य दलातील मतदार यांचा समावेश आहे. मतदान प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी 8 हजार 916 मनुष्यबळ असून 891 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात 18 महिला मतदान केंद्र आहेत. हे मतदान केंद्र सुशोभित करण्यात आले होते. त्यामुळे सर्वांच्या आकर्षणाचे ते केंद्र होते.
मतदानाचे कामकाज व देखरेखसाठी 607 वाहने सज्ज आहेत. तसेच जिल्ह्यातील 199 मतदान केंद्राचे वेब कास्टिंग करण्यात येत आहे. 4 हजार बॅलेट युनिट, दोन हजार कंट्रोल युनिट व दोन हजार व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून मतदान प्रकिया पूर्ण होणार असून 830 बीयू, 415 सीयू, 577 व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कुठेही अप्रिय घटना घडूनये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.