पोपटाची कानात कुजबुज
   दिनांक :18-Apr-2019
सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे, त्यामुळेच मला पक्षातून बाहेर पडावं लागले, अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. बीडमधील भाजपच्या सभेत सुरेश धस यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करत सर्वांनाच पोट धरून हसायला लावलं.
 
सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पक्षातील नेत्यांवर टीका करताना पशु-पक्ष्यांचा छंद असलेल्या राजाची गोष्ट सांगितली. सर्वात शेवटी आलेला पोपट राजाच्या कानात मिठू-मिठू बोलत असून त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावं लागल्याचं धस म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद लावल्याचं खापरही धसांनी ’मिठू’च्या नावावर फोडलं.
 
 
 
‘एका राजाला पशु-पक्ष्यांचा छंद होता. सर्वांना राजाकडून सारखी माया लावली जात होती. पण शेवटी आलेल्या पोपटावर राजाचा खूपच जीव जडला. पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे. राजालाही फक्त त्याचंच खरं वाटायला लागलं आहे. त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावं लागलं.
 
लोकसभेनंतर हा पोपट नसेल असा विश्वासही सुरेश धस यांनी व्यक्त केला. मात्र आता हा पोपट कोण असा सवाल उपस्थित होत आहे. बीडमध्ये भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. मात्र राष्ट्रवादीला खिंडार पाडत आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि प्रीतम मुंडेंना पािंठबा दर्शवला आहे.