मैत्री एक ऑक्सिजन!
   दिनांक :18-Apr-2019
 वेगळी गोष्ट 
प्रतीक्षा जोशी
 
मैत्री ही युगायुगांपासून चालत आली. कृष्ण-राधा असो की आपल्यासारखी! मैत्रीच्या अथांग सागरात विश्वासाची ‘नाव’ महत्त्वाची असते. तिच्या सहाय्याने हा सागर पार होईल. मैत्री हा दोन अक्षरी शब्द खूप काही सांगतो. नातं रक्ताचं नसून त्याहीपेक्षा मोठं असतं, कारण त्यात आपुलकी, विश्वास, माया असते.
 
 
ऑक्सिजन का बरं म्हटलं असेल मी? मैत्री ही एक ऑक्सिजनच आहे, असं मी म्हणते. मैत्री जी मुलांची मुलीसोबत किंवा मुली मुलींची, कुणाचीही असो, मैत्री हे एक नातं आहे, ज्यात सवयी जुळल्या, विश्वास निर्माण झाला की ती तयार होते. मैत्रीला पण तीन प्रकार असतात. माझ्या मते बालपणाची मैत्री, तरुण वयातली मैत्री, वृद्धापकाळातील मैत्री’ तसं बघितलं तर मैत्रीला बंधने नसतात. चिरकाळ टिकणारं नातं म्हणजे मैत्री आहे.
 
पण माणसाचं आयुष्य असं आहे, तिथे त्याचा स्वार्थ त्याला आपल्या मैत्रीपासून दूर नेतो. ऑक्सिजनसारखी मैत्रीच असते. ती कधीकधी कोणत्याही वेळी कमीजास्त होते, पण तितकीच महत्त्वाची असते. एखाद्या वृक्षाप्रमाणे मैत्री वाढत जाते. आयुष्यातल्या प्रत्येक वेळेला कधीकधी चांगली वेळ वा वाईट वेळ येते तरी मैत्रीचे झाड सदैव सावली देत असते. आयुष्य भरभरून टाकते. मैत्रीचं नातं ऑक्सिजनसारखं प्रत्येक श्वासात असते. एकदा का मैत्रीचा हात दिला तर तो मरेपर्यंत निभवायचा असतो. मग त्यात कितीही चांगली लोकं असोत वा वाईट फक्त सोबतीने चालायचं असते. म्हणूनच तर मैत्री एक ऑक्सिजन आहे. आयुष्याच्या वाटेवर मैत्रीरूपी ऑक्सिजन सदैव सोबत असतो.