निवडणूक काळात अंमली पदार्थ व दारुचा महापूर
   दिनांक :18-Apr-2019
निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात पैसा हा चलनात येतो. त्यात लोकसभा निवडणुका म्हटल्या की ओतल्या जाणारा पैसा हा कित्येक कोटींच्या घरात असतो. निवडणुकीदरम्यान जशी दारूची विक्री वाढते तसाच त्याचा परिणाम हा अमलीपदार्थांच्या विक्रीवरदेखील पडतो. यावेळी निवडणुकीतच अमलीपदार्थांची विक्री ५०-६० टक्क्यांनी वाढली आहे.
 
 
 
निवडणुकीची घेषणा होताच आचारसंहिता लागते. प्रत्येक उमेदवाराने प्रचारात किती पैसे खर्च करायचे, कितीच्या जाहिराती द्यायच्या, पक्षाने किती खर्च करायचे, या सगळ्याचे नियम असतात. पण नियमांना कसं धाब्यावर बसवायचं हे काही नेत्यांना सांगायला नको. या नियमांना डावलून सगळेच पक्ष आणि पक्षाचे लागेबंधे असणारे व्यापारी लाखो करोडो रूपये निवडणुकीत अक्षरश: ओततात. प्राचारात तुफान पैसा ओतला जातो, प्रचारात आणि सभांना गर्दी कशी जमवली जाते हे काही वेगळं सांगायला नको. प्रचाराला आलेल्या प्रत्येकाचा रेट ठरलेला असतो. त्या बरोबर पैसा हा अगदी तळागाळापर्यंच पोहोचवला जातो. अश्या प्रकारे आलेल्या पैशाचा थेट परिणाम हा दारू आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर होतो.
 
निवडणुकीदरम्यान अमली पदार्थांची विक्री वाढणे काही नवीन नाही आत्तापर्यंत निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली कारावाई डोळे दीपवणारी आहे. यावर्षी आतापर्यंतच ६ कोटी रूपयांचे अमलीपदार्थ आणि २१ कोटी रूपयांची दारू पकडण्यात आली आहे. जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे सरकतील आणि निवडणुकीची तारीख जवळ येईल तसे अमली पदार्थांची विक्री वाढणार आहे. यावर जरब बसावा म्हणून मुंबई पोलिसांनी देखील कंबर कसली असून आता ड्रग पेडलरवर थेट मकोका लावण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. निवडणकीदरम्यान तरी अमली पदार्थांची विक्री वाढू नये व निवडणुुका प्रभावीत होऊ नयेत, म्हणून निवडणूक आयोगासह पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत खर्‍या पण त्याला किती यश येते, हे दिसणारच आहे.