जगूया आनंदाने!
   दिनांक :18-Apr-2019
 खास बात 
सर्वेश फडणवीस
८६६८५४११८१ 
 
नवीन वर्षाचे सर्वदूर उत्साहात स्वागत झाले. नवीन वर्षाचा ताजेपणा, नवीन वर्षाचा नवोन्मेष आणि इच्छा, आकांक्षा, संकल्प सारे काही नवीन असते. नवीन वर्षाच्या निर्धारासाठी नव्या प्रेरणा घेऊन येणारे नवे वर्ष, नवा आनंदही घेऊन येतो आणि या आनंदाची कास धरत आपल्याला पूर्ण वर्षभराची दमदार व यशस्वी वाटचाल करायची असते.
  
‘आनंद’ हा शब्द उच्चारताना, ऐकताना किंवा वाचताना माणसाला ज्या अनुभूतीची जाणीव होते, त्याचेच नाव ‘आनंद!’ आनंद म्हणजे कधीही संपूच नये असे कायम वाटणारी जाणीव! आनंद ही माणसाच्या अंतःकरणातील निखळ, निर्मळ आणि सतत मिळणारी अनुभूती आहे आणि या अनुभूतीपर्यंत जाण्यासाठी माणूस कायम प्रयत्नशील असतो.
  
 
आनंद व्यक्त करण्याची संकल्पना प्रत्येकाची निराळी असेल. पण आनंदीत असणारी व्यक्ती तिच्या चेहर्‍यावरील प्रसन्नतेतून लगेच लक्षात येते. आनंद हा लपवून ठेवता येत नाही. तो देहबोलीतून व्यक्त होत असतो. आनंदी असणारा माणूस कायम सुदृढ असतो. आनंदी असल्यावर आपल्याला कुठलाही आजार होत नाही.
 
आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे. यामध्ये कायमस्वरूपी सकारात्मक व समाधानी भावना दर्शवली जाते. आनंद हा सर्वांची मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवतो.
 
आनंदाने जगण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून सुरुवात केली तर सर्वच घर आनंदाने भरून जाईल. कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदात असल्याने सर्वांचे आपापसातील संबंध आपुलकीचे व जिव्हाळ्याचे राहतील. मित्र-मैत्रिणी, संबंधित या सगळ्यांशी आपुलकीने वागलो तर ते नातं अधिक दृढ होत निखळ आनंदच देईल आणि या आनंदासाठी येणार्‍या प्रत्येकाबरोबर कायम आनंदी जगण्याचा प्रयत्न करूया. मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी कटिबद्ध राहूया. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवून, संपर्कात येणार्‍या प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील होऊन आनंद आणि समाधान मिळवूया. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघितले तर त्यातून ही आनंदाची, समाधानाचीच जाणीव होईल.
 
चला तर मग यासाठी आनंदी जगण्याचा प्रयत्न करूया...