नालायक...!
   दिनांक :18-Apr-2019
शुभ बोल रे...  
 
-विनोद देशमुख 
 
चौकीदार चोर है... या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत आरोप केला जात आहे. प्रामुख्याने कॉंग्रेसकडून आणि इतरही विरोधी पक्षांकडून देशभर या आरोपाचा गदारोळ उठविला जात आहे. त्याला उत्तर म्हणून भाजपाने मै भी चौकीदार... मोहीम काढली. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी स्वत:ला चौकीदार घोषित केलं. हे सुरू असतानाच राहुल गांधीने आगीत तेल ओतलं! बिहारमधील एका सभेत ते म्हणाले- नरेन्द्र मोदी, नीरव मोदी, ललित मोदी... सब मोदी चोर कैसे? मोदी आडनावाच्या एका मागास जातीला राहुल गांधी बदनाम करीत आहे, असा पलटवार करीत सत्ताधारी आता राहुलला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. 
 
 
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरून हल्लाबोल करताना राहुलला थेट नालायक म्हणून टाकले! सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुलसारखा नालायक माणूस संसदेत नको, अशी टीका ठाकरेंनी इस्लामपूरच्या सभेत केली. नालायक हा शब्द आपल्याला शिवी वाटू शकतो. प्रत्यक्षात नालायकचा अर्थ लायक नाही, असा आहे. राहुल गांधीने किमान दोनदा हे सिद्ध केले आहे. डॉ. मनमोहन सिंग हे स्वपक्षीय पंतप्रधान असताना त्यांचा एक आदेश राहुलने जाहीरपणे फाडून टाकला होता. भर लोकसभेत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची गळाभेट घेऊन नंतर डोळा मारण्याचा आचरटपणाही राहुलने केला. या दोन्ही घटना नेतेपदाच्या संदर्भात पुरेशा बोलक्या आहेत.
 
राहुल नेतेपदासाठी लायक नाही, असे खुद्द एका कॉंग्रेसनेत्यानेच पाच वर्षांपूर्वी सांगितले होते. हॉकीपटू आणि बैतुलचे खासदार राहिलेले गुफरान-ए-आझम यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधींना पत्र लिहून हे ठणकावले होते! दहा वर्षे खासदार राहूनही राहुल नेता बनू शकत नाही. तेव्हा त्याचा नाद सोडा, असा सल्ला गुफरानने सोनियांना दिला होता. याचे बक्षीस म्हणून गुफरानची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली! नंतर लवकरच गुफरानचे निधन झाले. 1980 मध्ये संजय गांधीने जे तरुण राजकारणात आणले, त्यातील एक असलेले गुफरान तब्बल पस्तीस वर्षे कॉंँग्रेसमध्ये होते आणि राहुल पक्षाला बरबाद करीत असल्याचा त्यांचा दावा होता, जो कॉंग्रेसने फेटाळला!
 
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राहुलला नालायक म्हणण्यात फार चुकीचे काही वाटत नाही. अंदमानच्या काळकोठडीत देशासाठी सश्रम कारावास भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर भित्रे अन्‌ भ्रष्टाचाराच्या आरोपात जामिनावर मोकळा असलेला राहुल गांधी मात्र मर्द! विद्यमान पंतप्रधानाला चोर म्हणत फिरणारा शूर! मतांसाठी शर्टावरून जानवे घालण्याचे नाटक करणारा खरा अन्‌ बाकीचे मात्र खोटे! मनाला येईल ते बोलत सुटणारा नेता लायक म्हणता येईल का? नेतेपदासाठी आपण लायक नाही, हे राहुल गांधी वारंवार सिद्ध करीत आहे. मग उद्धव ठाकरेंनी नालायक म्हटले तर चुकले कुठे !