इरफानला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
   दिनांक :18-Apr-2019
बराच काळ न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. आता तो 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सीक्वल 'अंग्रेजी मीडियम'चे शूटिंग करत आहे. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झालेला हिंदी मीडियम चित्रपटाचा सीक्वल आहे.
 
 
इरफान खान सध्या उदयपूरमध्ये 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचे चित्रीकरण करतो आहे आणि या सेटवरील व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. इरफानला पाहण्यासाठी त्याचे चाहते सेटवर गर्दी करत आहेत आणि त्याचे व्हिडिओ व फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. मात्र यामुळे निर्मात्यांचा त्रास वाढला आहे. कारण या चित्रपटातील सीन लीक होत असल्यामुळे निर्माते हैराण झाले आहेत आणि त्यांनी सेटवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार, जेव्हा चाहत्यांना समजले की इरफान ब्रह्मपूरीमध्ये चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. तर त्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे इरफान खानच्या सुरक्षेसाठी १८ सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत आणि सेटवरील सुरक्षेतही वाढ केली आहे.
सू्त्रांच्या माहितीनुसार, 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचे उदयपूरमधील चित्रीकरण पुढील महिन्यात संपणार आहे. उद्यपूरशिवाय लंडनमध्ये देखील या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटात इरफान खानसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अद्याप करीनाने या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केलेले नाही. करीना या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला जाणार आहे. अभिनेत्री राधिका मदन यात इरफानच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.