लग्न जुळत नसल्याने तरुणीची आत्महत्या
   दिनांक :18-Apr-2019
 
 
नागपूर: लग्न जुळत नसल्याच्या कारणावरून मनिषनगर येथील श्री शिव अपार्टमेंट येथे राहणाèया रश्मी विजय दुरने (३९) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रश्मीला आई आणि दोन लहान भाऊ आहेत. रश्मीचे लग्न करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी बरेच प्रयत्न केले होते. परंतु, लग्न जुळत नव्हते. रश्मीचे लग्न जुळत नसल्याने त्यांच्या लहान भावांचे देखील लग्न जुळत नव्हते. त्यामुळे रश्मी निराश झाल्या होत्या. आपल्यामुळे भावाचे लग्न जुळत नसल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
 

 
 
बुधवारी सकाळी रश्मीचे दोन्ही भाऊ आपल्या कामावर गेले होते. आई देखील एका लग्न कार्यक्रमाला गेली होती. घरी फक्त रश्मी एकट्याच होत्या. बेडरूममधील सिलिंग पंख्याला बेडशिट बांधून रश्मीने गळफास लावला. सायंकाळी ५.४५ च्या सुमारास त्यांची आई घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. गळफास लावण्यापूर्वी रश्मीने आपण कशासाठी आत्महत्या करीत आहोत या आशयाची एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.