२०५० मध्ये होईल भारत ‘ज्येष्ठ’
   दिनांक :18-Apr-2019
न्यूयॉर्क,
तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारताच्या लोकसंख्येत २०५०पर्यंत ज्येष्ठांचा टक्का वाढणार आहे. २०५०मध्ये देशातील एकूण लोकसंख्येपैकी ६० वर्षांवरील व्यक्तींच्या लोकसंख्येत २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या पहिल्या कायमस्वरूपी सचिव पैलोमी त्रिपाठी यांनी दिली आहे. वृद्धत्वाशी निगडित काम करणाऱ्या एका गटाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
 
 
 
‘सन २०५०मध्ये देशातील एकूण लोकसंख्येपैकी ६० वर्षांवरील व्यक्तींच्या लोकसंख्येतील वाढ ८ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. वाढते वय हे अपरिवर्तनीय आणि अपरिहार्य असते. त्यामुळे आताच तरुणांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करायला हवे. त्यामुळे आगामी काळात ते वाढत्या वयोमानामुळे येणाऱ्या आव्हानांना अधिक सामर्थ्याने सामोरे जाऊ शकतील. त्यांचे आरोग्य चांगले राहू शकेल. ते देशाच्या विकासात सक्रिय योगदान देऊ शकतील,’ असेही त्रिपाठी म्हणाल्या.
वृद्धत्व या विषयावर २००२मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक परिषदेत माद्रिद आंतरराष्ट्रीय कृती आराखड्याचा स्वीकार करण्यात आला होता. या आराखड्याने २१ व्या शतकात वृद्धत्वाची समस्या हाताळण्यासाठी काहीतरी ठोस कार्यक्रम मांडला जाण्याची गरज असल्याचे सूचित केले होते. या आराखड्यामध्ये वृद्ध व्यक्ती आणि विकास, वृद्धावस्थेतील आरोग्य आणि वृद्धांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे या तीन मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए)च्या ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन २०१९’ हा अहवाल गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या २०१९मध्ये १३६ कोटी आहे. ती १९९४मध्ये ९४.२२ कोटी होती. या लोकसंख्येत ६५ वर्षांवरील व्यक्तींच्या संख्येचे प्रमाण सहा टक्के होते. तसेच, भारतातील सरासरी आर्युमानातही वाढ झाली आहे. १९६९मध्ये सरासरी आर्युमान ४७ वर्षे होते. १९९४मध्ये ते ६०, तर २०१९मध्ये ६९ इतके झाले आहे.