उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी
   दिनांक :18-Apr-2019
- अनेक घातक शस्त्रांनी सज्ज
सेऊल,
एकीकडे अमेरिकेसोबत संपूर्ण नि:शस्त्रीकरणावर चर्चा सुरू असतानाच, उत्तर कोरियाने बुधवारी नव्या सामरिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अनेक घातक शस्त्रांनी सुसज्ज असे हे क्षेपणास्त्र आहे. यामुळे अमेरिकेची िंचता मात्र वाढली आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या उपस्थितीत या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली, असे वृत्त सरकारी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत किम जोंग उन यांची दुसरी चर्चाही अनुत्तीर्ण राहिल्यानंतर काही आठवड्यांमध्येच या देशाने ही चाचणी केली आहे. यामुळे अमेरिकेसोबतच्या तणावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

 
 
या क्षेपणास्त्राने चाचणीच्या काळात विविध लक्ष्यांचा अचूक भेद केला. चाचणीच्या सर्वच निकषांमध्ये हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरले, असे या वृत्तात म्हटले आहे. उत्तर कोरियाची सामरिक शक्ती यामुळे कितीतरी पटीने वाढणार असल्याचे पीपल्स आर्मीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्याही आंतरराष्ट्रीय रडारवर दिसून आली नाही, तसेच यामागचे कारण देण्यास किम जोंग उन यांच्या कार्यालयाने नकार दिला आहे.