आगीत वाचले पक्ष्याचे दुर्मिळ शिल्प
   दिनांक :18-Apr-2019

पॅरिस,

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या नोत्र देम कॅथेड्रलवरील पक्ष्याचे दुर्मिळ शिल्प भग्न अवशेषांमध्ये सापडले आहे. आगीच्या ज्वाळांचा फटका बसला असला तरी, ते पुन्हा दुरुस्त होऊ शकते, असे फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, आठशे वर्षांचा वारसा जपलेल्या या कॅथेड्रलशी संबंधित आठवणी जागवत नागरिक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी येत आहेत.

 
 
 

कोंबडासदृश्य असलेले हे शिल्प धार्मिकदृष्ट्याही अभिमानस्पद आहे. त्यात अनेक गोष्टींचा संगम झालेला आहे. 'क्राउन ऑफ थॉर्न्स'चा (येशूने क्रुसावर जाताना घातलेला मुकूट) तुकडा, फ्रान्सचे राष्ट्रीय चिन्ह मानला गेलेला पक्षी असे त्याचे स्वरूप असून ते हिरव्या रंगाचे आहे. कॅथेड्रलच्या उंच मनोऱ्यावर हे शिल्प स्थापित होते. आगीमुळे ते दूर पडले. त्यामुळेच ते वाचले. एका धार्मिक संस्थेकडे ते सुरक्षित सुपूर्द करण्यात आल्याचे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. सध्या कॅथेड्रलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक गोष्टी तेथून हलवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या आगीपासून सुरक्षित राहिल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

दरम्यान, फ्रेंच संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या वास्तूला लागलेल्या आगीमुळे परिसर उद्धवस्त झाला आहे. अनेक राजांचे राज्याभिषेक पाहिलेले, नेपोलियन बोनापार्टच्या उदयास्ताचे साक्षीदार, फ्रेंच राज्यक्रांतीची धग अनुभवलेले, महायुद्धांमध्ये झालेली फ्रान्सची होरपळ अनुभवलेले आणि आठशे वर्षांचा समृद्ध वारसा जपलेल्या नोत्र देम कॅथेड्रलच्या आठवणी जागवत नागरिक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी येत आहेत.