पुढील वर्षी २४ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक
   दिनांक :18-Apr-2019
नवी दिल्ली,
जपानची राजधानी टोकियो येथे पुढील वर्षी म्हणजे 2020 साली ऑलिम्पिक स्पर्धा खेळली जाणार आहे. पुढील वर्षी 24 जुलैपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेत 17 दिवस विविध देशांचे खेळाडू 339 सुवर्णपदकांसाठी झुंज देणार आहेत. या स्पर्धेची औपचारिक घोषणा  ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाईटवरून करण्यात आली आहे. नऊ ऑगस्टपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत 33 खेळांचा समावेश राहणार आहे. 
 
 
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या दोन दिवस आधीपासूनच प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होणार आहे. महिला फुटबॉलच्या प्राथमिक सामन्यांनी ही स्पर्धा सुरू होईल. उद्घाटनाचा शानदार समारंभ 24 जुलै रोजी आयोजित केला जाणार आहे. रोव्हिंग आणि तीरंदाजीच्या स्पर्धा 24 पासूनच सुरू होणार आहे. महिला नेमबाजीच्या 10 मीटर एअररायफल स्पर्धेचे आयोजन उद्घाटनाच्या एक दिवस आधीपासून करण्यात आले आहे. या पहिल्या दिवशी पदकांच्याही फेर्‍या होणार आहेत. पहिल्या दिवशी एकूण 11 पदकांचा निर्णय होणार आहे, यात नेमबाजीशिवाय तीरंदाजी, सायकिंलग, तलवारबाजी, ज्युडो, तायक्वांडो आणि वेटलिफ्टिंग या खेळांच्या पदकांचा समावेश आहे. दुसर्‍या दिवशी बास्केटबॉल स्पर्धा सुरू होतील.
 
1 ऑगस्ट रोजी 21 पदकांचा निर्णय लागणार आहे. या दिवशी ज्युडो, ट्रायथ्लॉन, नेमबाजीच्या पदकांकडे सार्‍यांचे लक्ष लागले राहणार आहे. त्यानंतरच्या दिवशी महिला मॅराथॉन, पुरुष 100 मीटर दौड, जिम्नॅस्टिक आणि पुरुष टेनिस एकेरी अशा एकूण 26 पदकांसाठी खेळाडू संघर्ष करताना दिसणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी एकूण 30 क्रीडा प्रकारच्या निर्णायक लढती होती. या दिवशी रिदम जिम्नॅस्टिक, महिला गोल्फ, पुरुष बास्केटबॉल, पुरुष फुटबॉल, पुरुष व्हॉलिबॉल, आर्टिस्टिक जलतरणचे अंतिम सामने होतील. या खेळांशिवाय इतरही अनेक खेळांचे अंतिम सामने त्या दिवशी होतील. 9 ऑगस्ट रोजी पुरुष मॅराथॉनने व रंगारंग समारंभाने स्पर्धेची सांगता होईल व खेळाडू पुढील ऑलिम्पिकमध्ये भेटण्याच्या आणाभाका घेत एकमेकांचा निरोप घेतील.