कृष्णाच्या मथुरा नगरीत कोण मारणार बाजी?
   दिनांक :18-Apr-2019
मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजपाने चित्रपट अभिनेत्री हेमामालिनी यांना दुसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हेमामालिनी या मतदारसंघातून विजयी झाल्या. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात हेमामालिनी शेतातील गव्हाच्या ओंब्या कापत असल्याचे तसेच ट्रॅक्टरवर बसल्याचे चित्र चांगलेच गाजले होते. त्यावरून हेमामालिनी यांची टिंगटवाळीही करण्यात आली होती. त्यामुळे शोलेतील बसंतीच्या मदतीसाठी वीरूला धावावे लागले.
 
आपल्या पत्नीच्या प्रचाराला आलेले चित्रपट अभिनेते धर्मेद्र यांनी आपला परिवार सुरुवातीपासून शेतकरी असल्याचे सांगितले. माझे वडील शिक्षक असले तरी आमच्याकडे शेतीही होती, त्यामुळे ते शेतातही काम करायचे. त्यामुळे शेतात पेरणीपासून पीक कापणीपर्यंतचे काम करण्याचा अनुभव मला आहे. शेतकर्‍यांच्या समस्या आम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, त्यामुळे शेतकर्‍यांनी भाजपाला विजयी करण्याचे आवाहनही धर्मेंद्र यांनी केले.
 
 
लोकांच्या आग्रहामुळे धर्मेंद्र यांनी शोले चित्रपटातील गाजलेला संवादही म्हणून दाखवला. तुम्ही हेमामालिनीला निवडून दिले नाही तर, या गावात पाण्याची टाकी आहे का, मी त्यावर चढेल. या गावात माझ्या खुप मावश्या आहेत, त्या येतील, आणि मी त्यांना मासीजीमासीजी म्हणेल, हा आपला लोकप्रिय संवाद ऐकवत धर्मेद्र यांनी मथुरेच्या लोकांना जिंकले. हेमामालिनीला निवडून दिल्यावर पुन्हा मथुरेला येण्याचे आणि शेतकर्‍यांसोबत जेवण करण्याचे आश्वासन धर्मेंद्र यांनी दिले. याआधी धर्मेद्र यांनी आपली एक ऑडिओ क्लीप जारी करत हेमामालिनी यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते.
 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हेमामालिनी यांनी राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांचा सव्वातीन लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. हेमामालिनी यांना ५ लाख ७४ हजार तर जयंत चौधरी यांना २ लाख ४३ हजार मते मिळाली होती. बसपाचे पंडित योगेशकुमार द्विवेदी तिसर्‍या तर सपाचे चंदनिंसह चौथ्या क्रमांकावर होते. या मतदारसंघात २०१४ मध्ये सपा, बसपा तसेच रालोद यांना मिळालेल्या मतांच्या बेरजेपेक्षा भाजपाची मते कितीतरी जास्त आहेत.
 
२००९ मध्ये रालोदचे जयंत चौधरी यांनी बसपाच्या श्यामसुंदर शर्मा यांचा पराभव केला होता. २००४ मध्ये कॉंग्रेसचे मानवेंद्रसिंह या मतदारसंघातून विजयी झाले. १९९६,९८ आणि १९९९ मध्ये भाजपाचे तेजवीरसिंह यांनी मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक केली. मात्र २००४ नंतर या मतदारसंघाने कोणत्याच उमेदवाराला दुसर्‍यांदा निवडून दिले नाही. त्यामुळे ही परंपरा तोडण्याचे आव्हान यावेळी हेमा मालिनी यांच्यासमोर आहे.
 
कृष्णजन्मभूमीसाठी प्रसिद्ध असलेल्या मथुरेत यावेळी हेमा मालिनी यांचा मुकाबला रालोदचे नरेंद्रिंसह आणि कॉंग्रेसचे महेश पाठक यांच्याशी आहे. सपा आणि बसपा यांच्या आघाडीत रालोद असल्याने या दोन पक्षांनी मथुरेची जागा रालोदसाठी सोडली आहे.
मथुरा लोकसभा मतदारसंघात छाता, मांत, गोवर्धन, बलदेव आणि मथुरा असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील छाता, गोवर्धन आणि मथुरा हे भाजपाकडे तर मांत विधानसभा मतदारसंघ बसपाकडे आहे. खासदार म्हणून हेमा मालिनी यांची कामगिरी फारशी चांगली नसली तरी मतदार यावेळी आपल्या मतदारसंघातील उमेदवाराकडे पाहून नाही, तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार असल्याचे या मतदारसंघातील अनेकांशी चर्चा केली असता जाणवले. कृष्णजन्मभूमीमुळे मथुरेची जागा भाजपासाठी प्रतिष्ठेेची आहे. त्यामुळे हेमा मालिनी यांचा अर्ज भरतांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
 
मथुरेचे मतदार हेमामालिनी यांना विजयी करत धर्मेद्र यांना आपल्या घरी जेवायला येण्याची संधी देतात की त्यांना पुन्हा पाण्याच्या टाकीवर चढवतात, हे २३ मेला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.