16 हजारांहून अधिक मुंबई पोलिस करणार टपाल मतदान
   दिनांक :19-Apr-2019
 
 
मुंबई: मुंबई महानगरातील तब्बल 16 हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी टपालाद्वारे मतदान करणार असल्याची माहिती आहे.
राज्यात येत्या 29 एप्रिल रोजी भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, नंदुरबार, धुळे,  दिंडोरी, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई दक्षिण, नाशिक, पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रीय राखीव सुरक्षा दलांच्या तुकड्यांसोबतच 50 हजार मुंबई पोलिस देखील सज्ज राहणार आहेत. रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात वास्तव्यास असणार्‍या पोलिस दलातील कर्मचारी तथा अधिकार्‍यांना प्रत्यक्ष मतदानास मुकावे लागणार आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कर्मचार्‍यांना टपालाद्वारे मतदान मतदान करण्याचे आवाहन मुंबई पोलिस प्रशासनाद्वारे करण्यात आले असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
याबात पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, बंदोबस्तासाठी निवड झालेल्या मुंबई पोलिस कर्मचार्‍यांना आम्ही टपालाद्वारे मतदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत 16 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी टपालाद्वारे मतदान करण्याची तयारी दर्शवली आहे. आम्ही याबाबत निवडणूक अधिकार्‍यांशी संपर्क साधला असून त्यांच्याकडे इच्छुकांचे अर्ज सुपूर्द केले आहेत.