‘आई’पुढची आव्हाने...
   दिनांक :19-Apr-2019
संपदा महेश राजे 
 
'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...' या ओळी आठवल्या की, प्रत्येक स्त्रीला स्वतःचे लहानपण आठवते. कारण ते रम्य दिवस आयुष्याच्या माळेतील मण्यांसारखे झरझर ओघळतात व रम्य ते बालपण केव्हा सरते ते कळतही नाही.
 
कारण, आजी, आजोबा, काकू, आत्या यांच्या सहवासातील संरक्षण किंवा सुरक्षित बालपण आनंदात घालवण्यासारखे रम्यच होते. परंतु, बदलत्या काळापासून 21व्या शतकातील आव्हाने, नवीन आई झालेल्या मुलींना नक्कीच तारेवरची कसरत करायला भाग पाडतात. कारण, करिअर व संसार या दोन्ही आघाड्या सांभाळताना त्या आनंदाने सर्व करताना दिसतात. त्यांच्यात असलेला उत्साह, शिक्षणाचा उपयोग, सुसंस्कारितपणा व समाजातील झालेले सकारात्मक बदल तिला स्वस्थ बसू देत नाहीत व एक संस्कारित घर, समाज व राष्ट्र घडविण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण!’ या उक्तीप्रमाणे आजच्या महिला, युवती व सर्वच वयोगटातील महिलांमध्ये एक चांगला सकारात्मक बदल बघायला मिळतो. तो म्हणजे सर्व कामांत असलेला उत्साह, आत्मविश्वास, नीटनेटकेपणा. आहाराबद्दल डोळस विचार, फिटनेस व समाजसेवा याकडे जास्त लक्ष देऊन, वेळेचा सदुपयोग कॅशलेस व्यवहार करून, आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा, वस्तूचा व वेळेचा चांगल्या कामासाठी वापर करू लागल्या आहेत.
 
आजची पिढी अधिकाधिक वैचारिक पातळी गाठून करीअर व घर यांचा चांगला मेळ बसवायला शिकली आहे. कारण, घरातील सर्व सदस्य, मित्रमैत्रिणी, नोकरीच्या ठिकाणी असलेले सहकारी याशिवाय मोबाईल, इंटरनेट यामुळे त्यांच्या प्रगतीत भर पडत आहे. त्यामुळे त्यांची मेहनत, रोज नवीन शिकण्याचा त्यांचा उत्साह, रोज नवीन आव्हाने, त्यांना कणखर व आत्मकेंद्रित करून धडाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपास येत आहे. सर्व जबाबदारी सामजंस्याने सोडवून, घरसंसार व नोकरी यात होणारी कसरत सांभाळत मातृपदावर पाऊल टाकले की, स्वतःची काळजी घेण्याविषयीची जागरूकता त्यांच्यात आली आहे. परंतु, वेळेअभावी स्वतःकडे लक्ष देण्यास कमी पडतात व ताण वाढत जातो.
नकळत मोबाईलचा, इंटरनेटचा वाढता वापर, तिच्या व गर्भावस्थेत बाळाच्या वाढीवर व तब्येतीवर वाईट परिणाम होऊन असंख्य घरांत व्यंग्य असलेले व जन्मदोष असलेले बाळ जन्माला येत आहे. त्याची सर्व जबाबदारी पूर्ण कुटुंबापेक्षा आईवर जास्त येते.
 
 
त्यामुळे गर्भावस्थेत- वाढते प्रदूषण, खाण्याच्या सवयी, आवडी-निवडी व मोबाईल यापासून स्वतःला दूर ठेवून तब्येतीच्या तक्रारी यातून मार्ग काढता आला पाहिजे.
यात मुलगी वाचवा, मुलींचा सन्मान करा, यातून आईची जबाबदारी आणखी वाढत आहे. कारण, मुलीला वाढवताना स्वतःला होणारा त्रास व तिला बाहेरच्या जगात वावरताना पूर्णपणे स्वयंसिद्ध करून स्वतःला संरक्षित राहण्याचे आत्मबल आणून स्वतःसारखाच आपल्या मुलीलाही आत्मसन्मान जपता आला पाहिजे, ही शिकवण आईच मुलीला देऊ शकते.
आई ही मुलीची पालक, गुरू, मैत्रीण, सखी, सर्व सुखदुःखांची सोबती असल्यामुळे ती नकळत आईचे अनुकरण करत असते, आईला पारखत असते व तिच्यातले चांगले गुणही आत्मसात करीत असते. त्यामुळे तिचे चारित्र्य, वागणे, बोलणे, नातेसंबंध टिकवून ठेवणे, साधी राहणी व उच्च विचारसरणी म्हणजे गबाळेपणा नव्हे, ही जाणीव आईनेच मुलीला करून देण्याची गरज आहे. कारण, निरोगी पिढी घडविण्याची जबाबदारी तिच्यावर आहे, हे विसरून चालणार नाही.
 
कारण, लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीकडे आईच्या संस्कारातूनच पारखले जाते व तेथे तिच्या चांगल्या गुणांचे नेहमी कौतुकच होते. त्यामुळे लहानपणापासून सर्व पदार्थ, भाज्या, व्हिटॅमिन, कॅल्शियम, हिमोग्लोबीन मुलींना हसतखेळत खायला शिकविले, तर त्यांचे महत्त्व त्यांना पटेल. पूर्वी हे सर्व घरातील आजी-आजोबा व इतर सदस्य करीत असत. सध्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पूर्णपणे आईवर भार पडत आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहिल्यामुळे पूर्ण कुटुंब निरोगी करण्याचे समाधान ती मिळवू शकते.
 
कारण, आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या प्रांतातील हवामान, राहणीमान याकडे दुर्लक्ष करून स्पर्धेत टिकण्याच्या ईर्ष्येने किंवा अट्‌टहासाने मुलींचे वागणे, बोलणे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी, पार्ट्या, सेल्फीचे वेड, वाढदिवस, विविध उपक्रमांतून येणारे एकत्रीकरण, ऑनलाईन शॉिंपग, मोबाईल, इंटरनेट, पैशाची उपलब्धता दुसर्‍याकडे आहे माझ्याकडे का नाही, हे सर्व आपल्या ध्येयापासून दूर करते, तेच घातक आहे. हे सर्व करीत असताना वागण्यात व राहणीमानात आलेला अघळपघळपणा कधीतरी आपल्याच हट्‌टाने किंवा अहंकाराने आत्मघाताची पावले टाकतो व नवीन काही करण्याच्या ईर्ष्येने व इतरांशी स्पर्धा किंवा तुलना करून, मीही करू शकते, असा फाजील आत्मविश्वास नकळत त्यांच्यात येतो व समोरच्या व्यक्तीकडून किंवा कधीकधी ओळखीतून, मैत्रीतून आपल्या स्वभावाच्या मोठेपणाचा किंवा अहंकाराचासुद्धा घात होतो व अनेक विवाह संस्था मोडकळीस येतात.
या सर्वांची जाणीव मुलींना करून देण्याची गरज आहे व ही सर्व जबाबदारी आईचीच आहे. कारण, मुलगी घराबाहेर पडली की, बाहेर असंख्य प्रश्नांना तिला सामोरे जावे लागते. त्यातून स्वतःला सुरक्षित व आत्मनिर्भर करण्याचा व त्यातून स्वतःला उत्तमप्रकारे सिद्ध करण्याचा, आपल्या शिक्षणाचा व संस्काराचा योग्य वापर करून पाऊल टाकण्यासाठी मुलीला आईच्या पािंठब्याची गरज असते.
 
‘‘तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे...’’ हा विश्वास प्रत्येक आईने मुलीला कायमच शिदोरीस्वरूपात देणे गरजेचे आहे. कोणतेही चांगले काम व वाईट अनुभव किंवा आयुष्यातील वळणावरचे खाचखळगे पार करताना तिला आईचीच आठवण यायला हवी. पाठीवर हात ठेवून फक्त एवढं म्हणा, म्हणजे मुलगी तितक्याच खंबीरपणे आपले आयुष्य, आपले करिअर व संसार, सर्व आघाड्या समर्थपणे पेलू शकते. सर्व भूमिकांना न्याय देऊ शकते. तेव्हाच मुलगी आई झाल्यावर म्हणेन- ‘‘अजूनही उंच माझा झोका...!’’