तिचे हसणेही बोचणारे...
   दिनांक :19-Apr-2019
डॉ. वर्षा गंगणे   
चेहर्‍यावरील हास्य ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल व सुंदर देणगी आहे. हसणारे चेहरे स्वत:सह इतरांचे चेहरेदेखील हसरे करून जातात, मने हलकी करून जातात. विज्ञानानेदेखील हास्य हे अनेक रोगांवरील विनामूल्य असणारे औषध आहे असे म्हटले आहे. दिलखुलास हसण्याने अनेक पेशी ताणल्या जाऊन मनावरील व मेंदूवरील ताण हलका होऊन जगण्याचा सकारात्मक संदेश मिळतो. म्हणून हसणे हा आपल्या दैनंदिनीचा एक अनिवार्य भाग असला पाहिजे, असे मत अनेकदा अनेक विचारवंत व अभ्यासकांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.
 
हसण्याचे अनेक प्रकार व उदाहरणे ऐतिहासिक काळापासून ऐकीवात आहेत. अगदी गालातल्या गालात हसण्यापासून ते सातमजली हसण्याची उदाहरणे व त्याची जादूभरली, रसभरली वर्णने अनेक ठिकाणी लिहून ठेवलेली आहेत. विनोद आणि हास्य यांचे सख्य सर्वपरिचित आहे. एका हास्याने समोरच्याचे हृदय जिंकता येते, मनातील मळभ दूर करता येते, मैत्रीचा हात पुढे करता येतो, शत्रूशी वैर संपविता येते, मनावरील ताण हलका करता येतो, अनेक मानसिक आजारांना दूर पळवून लावता येते अशी हास्याची महिमा सांगणारे गुण सर्वपरिचित आहेत. कदाचित म्हणूनच हसण्याला सौंदर्याचे एक आरसपानी प्रतीकदेखील मानले जाते. थोडक्यात हसणे हे जिवंत मनाचे लक्षण मानले जाते. पण, असे असले तरी हसण्यावर बंधने आणली जावीत हा एक न समजणारा व न पटणारा मुद्दा आहे. अनुत्तरित प्रश्न आहे. 

 
 
कोणी हसावे, किती हसावे, कुठे हसावे यालाही मर्यादेची चौकट घालणे म्हणजे एकप्रकारे व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालण्यासारखेच आहे. सततच्या धकाधकीच्या आयुष्यात लोकांजवळ हसण्यासाठीदेखील वेळ नाही. धावपळीच्या रहाटगाड्यात विनोदाला वावच उरला नाही. लहानसहान समारंभामधील मौज, गमती व खळखळून हसणे जवळजवळ हरवलेच आहे... आणि म्हणूनच कॉमेडी ऐकणे, हास्य क्लब व तसे कार्यक्रम आयोजित करणे, हास्यपूर्ण कार्यक्रम बघणे, विनोदी पुस्तके वाचणे गरजेचे वाटू लागले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विनोदी भूमिकेत आज स्त्रियाही वावरू लागल्या आहेत. ती हसवते तेव्हा, तिचे हास्याचे प्रयोग, तीही हसवू शकते किंबहुना तिच्या प्रयोगांना होते अफाट गर्दी असे नवीन मुद्दे तिच्याबाबतीत पुढे येऊ लागले आहेत. थोडक्यात चार्ली-चॅपलीन, जॉनी लिव्हर यासारखी मक्तेदारी असलेली पुरुषी नावे मागे पडून आता आदिती मित्तल, तृप्ती खामकर, मल्लिका दुवा यासारखी नवीन नावे हास्यक्षेत्रात पुढे येऊ लागली आहेत.
 
काळ बदलला तशा गरजा बदलल्या, कामाचे क्षेत्र व परिस्थिती बदलली. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने तिने त्याची सगळी क्षेत्रे काबीज केलीत. पण, ते समाजाला सहजपणे पचनी कसे पडेल? हा मुद्दा समोर येऊ लागला आणि पुन्हा एकदा लैंगिक विषमतेची पाळेमुळे आपले डोके वर काढू लागली. ‘सुहास्य तुझे मनास मोही...’ या तरल मुलायम ओळी अजूनही मनात आपले स्थान टिकवून आहे.
 
अगदी बालपणापासून चारचौघात मोठमोठ्याने हसू नकोस, एवढ्या मोठ्याने हसण्यासारखे काय आहे? पोरीबाळींनी मोठ्यांसमोर दात दाखवून हसू नये, हसणे हे सभ्य व सुसंस्कृत स्त्रियांचे लक्षण नाही, असे शब्द व संस्कार मुलींवर कळत-नकळतपणे केले जातात व त्याचा वारसा मुलगी आई झाल्यावर चालवीत पुढे नेत असते. तो प्रवास आता तिच्या हसण्याचे भांडवल होण्यापर्यंत आला आहे. सुहास्य तुझे... या तरल, मृदू, मधुर, रेशमी ओळींमधील मार्दव बधिर झाले की काय? असे वाटू लागले आहे.
सुदृढ, सक्षम, पुरोगामी व महासत्ता होऊ पाहणार्‍या भारतात तिचे हसणे हा चर्चेचा विषय व्हावा हे खरे तर अत्यंत लाजिरवाणे व प्रक्षोभकच म्हणावे लागेल. समानतेच्या वाटेवर असमानतेची बिजे पेरणारे हे चित्र आहे असेच म्हणावे लागेल. शिष्टाचार या नावाखाली निर्मळ व स्वच्छ मनाची गळचेपी केली जात आहे. विशेषत: त्याच्याकडून तिच्या हसण्याच्या स्वातंत्र्यावरही बंधने घातली जात आहेत असेच म्हणावे लागेल...!
 
अधिक स्पष्ट बोलायचे झाल्यास हसणे हा तिचा गुन्हा ठरविला जात आहे व ती कशी दोषी आहे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. जे शेवटी तिच्या चारित्र्यहननापर्यंत जाऊन पोहोचतात. तिची अब्रू वेशीवर टांगली गेली की, ती चटकन गप्प बसते हा पुरुषी समज आजही तेवढाच सब्बळ आहे, हे पुन्हा पुन्हा अनुभवास येत आहे. विकासाच्या वाटेवर तिचे हसणेही एवढे जिव्हारी लागणारे असेल तर लैंगिक समानतेचे कितीही पाठ गिरवले आणि प्रयत्न केले आणि कायदे व योजना घोषित केल्या तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण समानतेसाठी खरी गरज आहे ती वैचारिक परिपक्वतेची आणि मानसिक परिवर्तनाची जी अजूनही समाजात रुजली नाही. ज्यांनी ती अंगीकारली तो पुरुषवर्ग उपहास व उपेक्षेचा विषय ठरला व ठरविला गेला. हे कटूसत्य व समाजव्यवस्थेचे पर्यायाने देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
 
तिच्या हसण्याने घडलेल्या परिणामांची साक्ष देणारा इतिहास काल होता तोच आजही आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. रावणाची लाडकी बहीण शूर्पणखेने हसून प्रेमभावना व्यक्त केली म्हणून रामाच्या आज्ञेने लक्ष्मणाने तिचे नाक कापून तिला विद्रूप केले. मयसभेत हसणारी द्रौपदी दुर्योधनाच्या विकृत मानसिकतेची बळी ठरवली गेली. मृत्युशय्येवरून पितामह भीष्म राजकारणाचे धडे देत असताना त्यातील पोकळपणा व विरोधाभास ऐकून द्रौपदी पुन्हा एकदा मोठ्याने हसली तेव्हा अर्जुन तिच्या अंगावर धावून गेला. ही सगळी उदाहरणे तिच्या स्वातंत्र्यावरील बंधने उजागर करण्यास पुरेशी आहेत. पण, ही उदाहरणे ऐतिहासिक व अनादिकाळातील झालीत. अगदी वर्तमानातील २१ व्या शतकातील स्त्रीशक्तीचे गोडवे गाण्याच्या काळात संसदेत रेणुका चौधरींचे मोठ्याने हसणे अनेकांच्या जिव्हारी लागून गेले व त्यावर अनेक चर्चा, आरोप व मीपणा दुखावला गेल्याच्या प्रतिक्रिया बाहेर पडल्या.
 
एकूणच काय तर तिच्यावर दहशत निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. भविष्यातही अशा घटनांना खतपाणी घालणार्‍या अनेक सुपीक डोक्याच्या व्यक्ती निपजतील व या चित्रात अधिकाधिक रंग भरण्याचा प्रयत्न करीत राहतील. पण, यातूनही ती आपल्या अस्तित्वाचे अमिट ठसे कालच्याप्रमाणे आजही व उद्याही उमटवीत राहील. सावित्री ते मलाला हा प्रवास बघता अनेक कर्त्या स्त्रियांनी डोक्यावरचा पदर कंबरेला खोचून वैचारिक व सामाजिक परिवर्तनाची वाट निवडली. त्यांनाही विरोध झाला, पण मागे फिरल्या नाहीत. जगात ६ व्या क्रमांकावर जाऊन बसलेल्या देशाला स्त्रियांच्या हसण्याचे एवढे वावडे असेल तर, तिचे हसणे इतके व्यथित करणारे असेल तर लोकसंख्येचा तिचा हिस्सा अजूनही कसा उपेक्षित आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भयमुक्तता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि वैचारिक जागरुकता ही मोकळ्या हास्याची कारणे आहेत, त्याची एक ताकद आहे, जगण्याची उमेद आहे, सावरण्याची प्रेरणा आहे. ज्यांच्याजवळ या बाबी आहेत त्या स्त्रिया तशाच हसत राहणार आहेत आणि हसण्याची हिंमत करत राहणार आहेत. तिचे हसणे आणि समाजाचे रूसणे हे समीकरण आता बदलणे गरजेचे आहे की, यासाठीही तिला स्वतंत्र संघर्ष करावा लागेल? असा प्रश्न मात्र विचार करायला लावणारा आहे.