चीन नौदलाच्या स्थापनादिनी भारताच्या युद्धनौका सहभागी होणार
   दिनांक :19-Apr-2019
नवी दिल्ली,
चीनच्या नौदलाच्या स्थापनेच्या 70 व्या वर्धापनदिनी आयोजित आंतरराष्ट्रीय सागरी कवायतीत भारताच्या दोन युद्धनौका सहभागी होणार आहेत. पुढील आठवड्यात चीनच्या िंकगडाव येथील किनारपट्टीच्या भागात या सागरी कवायती होणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी आयएनएस कोलकाता आणि आयएनएस शक्ती या दोन भारतीय युद्धनौका येत्या रविवारी येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
 

 
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिंपग हे 23 एप्रिल रोजी या सागरी कवायतींच्या उद्‌घाटनीय कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. सुमारे 60 देश यात सहभागी होणार असल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी सांगितले. या कवायतींमध्ये नौदलाच्या युद्धनौका, लढाऊ विमाने आणि अद्ययावत पाणबुड्या सहभागी होणार आहेत. विविध देशांमधील नौदलांमध्ये सहकार्य वाढविण्यासोबतच, प्रत्येक देशाला आपली सागरी क्षमता दाखविण्याची संधी यातून मिळणार आहे. भारताने फेबु्रवारी 2016 मध्ये विशाखापट्टनम्‌च्या समुद्रात अशाच प्रकारच्या सागरी कवायतींचे आयोजन केले होते. यात 50 देशांच्या सुमारे 100 युद्धनौका सहभागी झाल्या होत्या.