अल्पवयीन तरुणीवर ढोंगी बाबाचा अत्याचार
   दिनांक :19-Apr-2019
 
 
 गोंदिया :  उपचाराच्या नावावर ढोंगी बाबाने एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गोंदिया येथे समोर आली आहे. या नराधमाने मुलीला सात दिवस बंद घरात डांबून ठेवत तिच्यावर सतत पाच दिवस अत्याचार केला. लंकेश उर्फ वामनराव मेश्राम (३० वय, रा. फुलचूर) असे या ढोंगीबाबाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
 
 
 
 
 
शहरातील १७ वर्षी अल्पवयीन मुलीच्या छातीला गाठ आल्याने ती गाठ दुरूस्त करून देण्याचा दावा फुलचूर येथील लंकेश उर्फ वामनराव मेश्राम या ढोंगी बाबाने तिच्या परिवाराला केला. त्यामुळे लंकेश याला २७ मार्च रोजी उपचारासाठी घरी बोलाविण्यात आले. त्याने उपचाराच्या नावावर घरातील सर्व मंडळींना काळ्या रंगाची एक गोळी खायला दिली. त्या गोळीमुळे सर्वांना गुंगी यायची. त्या सर्व गुंगीत असताना आरोपी लंकेश हा १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करायचा. २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपचाराच्या नावावर त्याने त्या पीडित मुलीलाच नव्हे, तर घरात उपस्थित सर्व मंडळींना काळ्या रंगाची गुंगी आणणारी औषधी दिली. त्यानंतर गुंगीत असलेल्या त्या पीडितेच्या नातेवाईकांसमोरच त्याने सतत पाच दिवस त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. 
३१ मार्च रोजी आरोपी लंकेश याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. परंतु, त्यात तो यशस्वी झाला नाही. दरम्यान, १ ते ४ एप्रिलदरम्यान दररोज चार दिवस त्याने तिच्यावर बळजबरी केली. याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, ३७६ (२) (जे) (एन), ३४२, ५०६ सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.